‘त्यांना’ हवीय मायेची ऊब

By Admin | Updated: November 14, 2014 23:57 IST2014-11-14T23:52:23+5:302014-11-14T23:57:01+5:30

हाक कोल्हापूरकरांना : झोपडपट्टी, वसाहतींमध्ये सुमारे अडीच हजार लहान मुले उघड्यावर

'They' bore the craziest of myths | ‘त्यांना’ हवीय मायेची ऊब

‘त्यांना’ हवीय मायेची ऊब

संतोष मिठारी -कोल्हापूर -पत्रे अथवा ठिगळे लावून जोडलेल्या ताडपत्रींचा आडोसा असलेला निवारा, त्याच ठिकाणी पसरलेली अस्वच्छता, अशा परिस्थितीत जगण्याचे स्वप्न घेऊन वाढणाऱ्या सुमारे अडीच हजार लहान मुला-मुलींना थंडीने कुडकुडत कशीबशी रात्र काढावी लागत आहे. भंगार, कचरा गोळा करून कसेबसे पोट भरणाऱ्या त्यांच्या पालकांना इच्छा असूनही ऊबदार तर लांबच; पण अंगभर कपडे मुलांना घेणे शक्य नाही. कोल्हापुरातील झोपडपट्टी, वसाहतींमधील हे चित्र आहे. कोणतेही क्षेत्र असो, त्यातील मदतीसाठी साद दिल्यानंतर त्याला भरूभरून प्रतिसाद देण्यात कोल्हापूरकर कधीच मागे राहिलेले नाहीत. आपली जुनी कपडे, स्वेटर्स देऊन कोल्हापूरकरांनी या चिमुकल्यांना मायेसह माणुसकीची ऊब देण्याची गरज आहे.
ताडपत्री, तट्टे अथवा पत्र्यांच्या आधाराने दाटीवाटी उभारलेली झोपड्यावजा घरे, तुंबलेल्या गटर्स आणि रस्त्यांवरून वाहणारे ड्रेनेजचे पाणी अशा स्वरूपातील अस्वच्छतेचे पसरलेले साम्राज्य अशा परिसरात मळकट-कळकट झालेली कपडे घालून फिरताना लहान मुले-मुली दिसतात. त्यातील अनेकांच्या अंगावर नुसताच शर्ट नाही, तर चड्डी. दिवसभर अशाच अवस्थेत सगळ्या वस्तीभर हिंडत-खेळत ही चिमुकले फिरतात. सकाळपासून राबून सायंकाळी घरी आलेली आई, वडील अथवा आजींने केलेले चार घास खाल्यानंतर ही चिमुकले शेणाने सारवलेली, तुटक्या-फुटक्याफरश्या बसविलेल्या नाही, तर कागदी पुठ्ठे, बॅनर्स पसरलेल्या जमिनीवर झोपतात. वाढणाऱ्या रात्रीत अंगाला झोंबणाऱ्या थंडीची भर
पडते आणि कुडकुडत या चिमुकल्यांची कशीबशी सकाळ उगवते. वाढलेल्या थंडीत आई, बाबा अथवा आजीला बिलगून ती उबीचा शोध घेतात; पण पोटाला चार घास मिळावेत म्हणून कसरत करावी लागणाऱ्या आई-वडिलांना इच्छा असूनही आपल्या मुलांना अंगभर आणि ऊबदार कपडे देणे शक्य होत नसल्याचे वास्तव आहे. ऊस तोडणीसाठी मराठवाडा, विदर्भातून आलेल्या काही टोळ्यांनी जिल्ह्यात विविध ठिकाणी पाल बसवून वस्त्या बनविल्या आहेत. या वस्त्यांवरील चिमुकल्यांची देखील अशीच अवस्था आहे. शहरातील एका स्वयंसेवी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात अशी उघड्यावर, अर्ध्या कपड्यांमध्ये राहणारी सुमारे अडीच हजार मुले-मुली आढळून आल्या आहेत. त्यांना आपआपल्या परीने मदत करून कोल्हापूरकरांनी माणुसकीची ऊब देण्याची गरज आहे.


जुनी कपडे,
ब्लँकेट देऊन करा मदत
आपल्या घरातील अडगळीमध्ये पडलेली, वापरात नसलेली लहान मुलांची कपडे अथवा ब्लँकेट, चादर, गोधडी स्वच्छ धुऊन अशा झोपडपट्टी, वसाहतींमधील चिमुकल्यांची कडक थंडीतील रात्र सुसह्य करा. समाजातील या गरीब, वंचित स्थितीतील चिमुकल्यांच्या मदतीसाठी दानशूर व्यक्ती, संस्था आणि स्वयंसेवी संस्थांनी यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.


कसं-बसं पोट भरतोय; चांगली कपडे तर लांबच
भंगार गोळा करणाऱ्या यादवनगर वसाहतीतील ५२ वर्षीय मीराबाई चौगुले सांगतात की, दिवसभर राबल्यानंतर पोट भरण्यासाठी चार पैसे मिळतात. त्यातून नातीचादेखील सांभाळ करते. घरही साधेसुधेच आहे. फारसे पैसेच नसल्याने इच्छा असूनही चांगले कपडे नातीला देणे शक्य होत नाही. माझ्यासारखीच वस्तीतील अनेकांची स्थिती आहे. संभाजीनगर येथे स्टोव्ह रिपेरिंगचा व्यवसाय करणाऱ्या कमल शिंदे यादेखील नातीला सांभाळतात. त्या म्हणाल्या, शहरातील विविध झोपडपट्टी, वसाहतींमधील प्रत्येक घराची एक वेगळीच कथा आहे. कुणाची आई आजारी, कुणाचा बाबा व्यसनाधीन, कुणाला आई-वडीलच नाहीत. अशा स्थितीत आजी, मावशी, आई या भंगार अथवा कचरा गोळा करून, धुणी-भांडी करून आपला आणि त्यांच्यावर जबाबदारी असलेल्या मुलांचा उदरनिर्वाह करतात. इथं पोट भरतानाच दिवसभर वणवण करावी लागते. मग, त्यांना चांगले आणि ऊबदार कपडे कुठून मिळणार. त्यामुळे अनेक मुलांना अशी थंडीने कुडकुडतच रात्र काढावी लागते. या समाजातील गरीब आणि वंचितांची परिस्थितीची जाणीव करून देणारी प्रातिनिधिक स्वरूपातील उदाहरणे आहेत.

याठिकाणी आहे
मदतीची गरज
यादवनगर-डवरी वसाहत
विचारेमाळ
संभाजीनगर पेट्रोल
पंपामागील वसाहत
वारे वसाहत
सागरमाळ-दौलतनगर
मुडशिंगीच्या माळावरील झोपडपट्टी
राजेंद्रनगर
टिंबर मार्केट-गंजीगल्ली

Web Title: 'They' bore the craziest of myths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.