चंदगडमध्ये पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागणार

By Admin | Updated: September 3, 2016 00:59 IST2016-09-03T00:38:25+5:302016-09-03T00:59:51+5:30

मतदारसंघ पुनर्रचनेचा परिणाम : अनेकांनी गुडघ्याला बांधले बाशिंग; भरमूअण्णांना बालेकिल्ल्यातच धक्का

There will be a lot of respect for the parties in Chandigarh | चंदगडमध्ये पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागणार

चंदगडमध्ये पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागणार

नंदकुमार ढेरे-- चंदगड --जि. प. व पं. स.च्या निवडणुका लढविण्यासाठी अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. मतदारसंघ पुनर्रचना झाल्यामुळे अनेकजणांच्या इच्छेवर पाणी पडले आहे. इच्छा पूर्ण होतात की त्यांच्या इच्छेवरही पाणी पडते हे आरक्षण जाहीर झाल्यानंतरच कळणार आहे.
चंदगड तालुक्यात जि.प. व. पं.स.वर राष्ट्रीय काँगे्रसचे वर्चस्व आहे. नुकतेच माजी आमदार नरसिंगराव पाटील यांचे झालेले निधन व घटलेला हलकर्णी जि.प. मतदारसंघ, दौलत सुरू करण्यात अप्पी पाटील यांनी घेतलेला पुढाकार यामुळे येणाऱ्या जि.प. व पं.स. निवडणुकीची समीकरणेच बदलली आहेत.
चंदगड तालुक्यात हलकर्णी, तुर्केवाडी, अडकूर, चंदगड, कुदनूर हे जि.प.चे ५, तर हलकर्णी, मागणाव, तुडये, तुर्केवाडी, नांदवडे, चंदगड, अडकूर, कानूर, कुदनूर व कोवाड हे पं.स.चे १० मतदारसंघ होेते. पण, निवडणूक आयोगाच्या नवीन धोरणानुसार हलकर्णी हा जि. प., तर माणगाव व हलकर्णी हे पं.स.चे दोन मतदार कमी झाले आहेत. आता नव्याने चंदगड, कुदनूर, तुडये, माणगाव हे जि.प.चे चार, तर अडकूर, चंदगड, माणगाव, हेरे, कुदनूर, कालकुंद्री, तुडये व हलकर्णी असे आठ नवीन मतदारसंघ उदयास आले आहेत. त्यामुळे हलकर्णी जि. प. मतदारसंघात इच्छुक असलेल्या आता हेरे जि.प. मतदारसंघासाठी नव्याने व्यूहरचना करावी लागणार आहे.
हलकर्णी मतदारसंघ हा माजी मंत्री भरमूअण्णा पाटील यांचा बालेकिल्ला आहे. हा मतदारसंघ घटल्याने त्यांना जबर धक्का बसला आहे.
जि.प.व पं.स.च्या गत निवडणुकीत राष्ट्रीय काँगे्रसचे ज्योती दीपक पाटील (हलकर्णी), महेश पाटील (तुर्केवाडी), तात्यासाहेब देसाई (अडकूर), राजेंद्र परीट (चंदगड) हे जि. प.चे ४ व विद्यमान उपसभापती शांताराम पाटील (हलकर्णी), अनिल सुरुतकर (माणगाव), सभापती ज्योती पाटील (तुर्केवाडी), निंगो गुरव (तुडये), तुळसा तरवाळ (चंदगड), बबन देसाई (अडकूर) हे पं.स.चे ६ उमेदवार निवडून आले होते. राष्ट्रवादीचे जि.प.च्या सुजाता पाटील (कुदनूर) व पं.स.चे हसिना नाईकवाडी (नांदवडे), अनुराधा पाटील (कानूर), नंदिनी पाटील (कोवाड) व कल्लाप्पा नाईक (कुदनूर) हे निवडून आले होते.
जि.प.चे माजी अध्यक्ष भरमूअण्णा पाटील (बसर्गे), शिक्षण व बांधकाम समिती सभापतिपदी भरमाण्णा गावडा (हलकर्णी), महेश पाटील (म्हाळेवाडी), महिला व बालकल्याण समिती सभापतिपदी देवयानी सावंत-भोसले, पुष्पमाला जाधव (कुदनूर), विद्यमान सभापती ज्योती पाटील यांना काम करण्याची संधी मिळाली आहे.
शंकुतला देसाई, शिवाजी सावंत, मल्लिकार्जुन मुगेरी, बी. डी. पाटील, संताजी जाधव, कै. रामचंद्र कुंभार, कै. शंकर घोरपडे, शंकर आंबेवाडकर, बाळासाहेब घोडके, आदींनी सदस्य म्हणून काम केले आहे.
गत विधानसभा निवडणुकीपासून तालुक्यातील राजकीय संदर्भ बदलले आहेत. दिवंगत माजी आमदार नरसिंगराव पाटील यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत हाताऐवजी सेनेच्या धनुष्यावर निवडणूक लढवली होती. थोडक्यात भरमूअण्णा पाटील व कै.नरसिंगराव पाटील यांनी काँगे्रसच्या झेंड्याखाली गत जि.प. व पं.स. निवडणुकीत यश खेचून आणले होते. नरसिंगराव पाटील यांनी विधानसभेत शिवसेनेत प्रवेश केल्याने काहीअंशी चंदगड तालुक्यातील काँगे्रसला मतामध्ये फरक जाणवणार आहे.
काँगे्रसला गतवैभव प्राप्त करून देण्याची जबाबदारी भरमूअण्णा पाटील, तालुकाध्यक्ष नामदेव दळवी, प्रदेश सदस्य सुरेशराव चव्हाण-पाटील आदी कार्यकर्त्यांवर आहे. तालुक्यात या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी पक्षालाही रिचार्ज व्हावे लागणार आहे. भरमूअण्णा, नरसिंगराव पाटील व गोपाळराव पाटील यांचे नाराज कार्यकर्ते म्हणजे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असे समीकरण होते. त्यामध्ये आता नव्याने भर पडली असून, तीनही पाटलांचे अधिक राष्ट्रवादीचे नाराज कार्यकर्ते म्हणजे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अप्पी ऊर्फ विनायक पाटील यांचा गट असे चित्र सध्या तालुक्यात आहे. गोपाळराव पाटील यांच्या भाजप प्रवेशाने तालुक्यात भाजपला बळकटी येत आहे. अप्पी यांनी जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला दौलत कारखाना सुरू करण्यास प्रारंभ केल्याने तालुक्यातील जनताही त्यांच्याकडे आशेने बघत आहे. पण, शेतकऱ्यांची मागील देणी देऊन इतर कारखान्यांच्या बरोबरीने सोयी सवलती दिल्या तरच शेतकरी त्यांच्याबरोबर राहतील, हेही त्यांनी विसरून चालणार नाही.
तालुक्यात पक्षापेक्षा गटाला मोठे महत्त्व आहे. त्यामुळे गटाची मते हीच पक्षाची मते आहेत. गत विधानसभा निवडणूक कै. नरसिंगराव पाटील यांनी जरी शिवसेनेतून लढवली तरी त्यांचे पुत्र राजेश पाटील हे काँगे्रसमधून ‘गोकुळ’वर संचालक, महेश पाटील हे काँगे्रसचे जि. प. सदस्य आहेत. त्यामुळे त्यांना काँगे्रसलाच मदत करावी लागणार हे निश्चित आहे. त्यामुळे काँगे्रसची ताकद पहिल्या इतकीच राहणार आहे.
भाजपच्या गोटतून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे गोपाळराव पाटील यांना पाठबळ देत असल्याने भाजपही तालुक्यात आपली पाळेमुळे खोलवर रूजवत आहे. संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख विजय देवणे, प्रा. सुनील शिंत्रे, संग्राम कुपेकर यांच्या सहकार्यातून तालुक्यात मोठ्या प्रमाणात स्थापन केलेल्या शाखा यावेळेला प्रभाकर खांडेकर, महादेव गावडे, राजू रेडेकर, अशोक मनवाडकर यांना नक्कीच साथ देतील.
बदललेले मतदारसंघ, गोपाळरावांचा भाजप प्रवेश, अप्पी पाटील यांचे दौलत सुरू करण्यास झालेले प्रयत्न, माजी आमदार नरसिंगराव पाटील यांचे निधन यामुळे जि.प. व पं.स. निवडणूक सर्वार्थाने काँगे्रस, राष्ट्रवादी, भाजप व शिवसेनेला आव्हान देणारी आहे.


इच्छुकांना दुसऱ्या मतदारसंघाचा आधार
संभाव्य चंदगड नगरपंचायत करण्याच्या दृष्टीने तालुक्यातील मतदारसंघाची पुनर्रचना करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर चंदगड नगरपंचायतीकरिता होणारे मतदान जि.प. व. पं.स.करिता होणार नाही. त्यामुळे जि.प. व पं.स.चे मतदार घटवून काही गावे बदलून नवीन मतदारसंघ अस्तित्वात आणले आहेत. त्यामुळे अगोदरच फिल्डिंग लावलेल्या इच्छुक उमेदवारांना दुसऱ्या मतदारसंघाचा आधार घ्यावा लागणार आहे.
माजी आमदार नरसिंगराव पाटील यांच्या निधनानंतर दौलत व जिल्हा बँक यांच्या कराराला विरोध करण्यासाठी तुर्केवाडी येथे जमलेल्या सर्वपक्षीय बैठकीनुसार काँगे्रस, भाजप, शिवसेना, स्वाभिमानी एकत्र येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात राष्ट्रीय काँगे्रस, भाजप, शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी विरुद्ध अप्पी पाटील युवा मंच अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.


इच्छुक उमेदवार : चंदगडमधून : उपसरपंच सचिन बल्लाळ, तात्यासाहेब देसाई, राजेंद्र परीट, आण्णा वाटंगी, बबन देसाई. कुदनूरमधून : कल्लाप्पा भोगण, सुरेश घाटगे, शंकर आंबेवाडकर, राजू रेडेकर, एम. जे. पाटील, सुजाता पाटील, अजित व्हन्याळकर. तुडयेमधून : बी. डी. पाटील, विद्यमान उपसभापती शांताराम पाटील, निंगू गुरव, बाळू चौगुले, प्रभाकर खांडेकर, नारायण पाटील. माणगाव जि. प. : विद्यमान महिला व बालकल्याण सभापती ज्योती पाटील, शामराव बेनके, महादेव प्रसादे, अ‍ॅड. संतोष मळवीकर, नितीन पाटील, उदयकुमार देशपांडे, आर. जी. पाटील, शिवाजी सावंत, निंगाप्पा आवडण, संजय पाटील.

Web Title: There will be a lot of respect for the parties in Chandigarh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.