सुधारित संच मान्यतेविरुद्ध तीव्र आंदोलन करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:26 IST2021-08-15T04:26:06+5:302021-08-15T04:26:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर: शासनाचा सुधारित संच मान्यतेचा शासन आदेश शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक घटकावर गंभीर परिणाम करणारा असल्याने ...

सुधारित संच मान्यतेविरुद्ध तीव्र आंदोलन करणार
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर: शासनाचा सुधारित संच मान्यतेचा शासन आदेश शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक घटकावर गंभीर परिणाम करणारा असल्याने याविरुद्ध तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या विद्याभवन येथे झालेल्या सभेत करण्यात आला. पुणे विभागाचे शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली व व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. लाड यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी सभा झाली.
सुधारित संच मान्यतेच्या आदेशामुळे अनेक शिक्षकांची सेवा संपुष्टात येणार आहे. शाळेतील क्रीडा शिक्षक, कला शिक्षक व मोठ्या प्रमाणावर शिक्षकांची व शिक्षकेतर सेवकांची संख्या कमी होऊन बेकारी वाढेल. शाळा तिथे मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक, कला शिक्षक व पुरेसे शिक्षकेतर सेवक असलेच पाहिजेत, अशी व्यासपीठाची मागणी आहे. व्यासपीठातर्फे अभ्यास गटाची निर्मिती करून संच मान्यता निकष कसे असावेत, याबाबत शालेय शिक्षण विभागाला निवेदन देण्याचेही ठरले. कायम विनाअनुदानित शाळांना प्रचलित नियमांनुसार त्वरित अनुदान दिले पाहिजे, अशी मागणीही झाली.
यावेळी शिक्षक दत्ता पाटील, बी. जी. बोराडे, बाबासाहेब पाटील, भरत रसाळे, राजाराम वरुटे, खंडेराव जगदाळे, सुधाकर निर्मळे, पी. एस. हेरवाडे, प्रा. सी. एम. गायकवाड, व्ही. जी. पोवार, उदय पाटील, प्राचार्य डॉ. डी. एस. घुगरे, प्राचार्य एन. आर. भोसले, संतोष आयरे उपस्थित होते.
चौकट
मनपाडळे हायस्कूल मनपाडळे (ता. हातकणंगले) व कोल्हापुरातील डॉ. श्रीधर सावंत विद्या मंदिर या दोन्ही शाळांच्या संस्थाचालकांविरुद्ध गंभीर तक्रारी आल्याने या दोन्ही शाळांच्या संस्थाचालकांना भेटून होणारा अन्याय दूर करण्यासाठी व्यासपीठ प्रयत्न करणार आहे.
चौकट
आयसोलेशनला डायग्नोस्टिक सेंटर
कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर सेवकांनी जमा केलेल्या निधीतून आयसोलेशन हॉस्पिटल येथे डायग्नोस्टिक सेंटर लवकरच उभे केले जाणार असल्याचे आसगावकर यांनी सांगितले.
फोटो कॅप्शन
फोटो: १४०८२०२१-कोल-शिक्षक
फोटो ओळ: कोल्हापुरात शैक्षणिक व्यासपीठाच्या सभेत शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी मार्गदर्शन केेले. यावेळी अध्यक्ष एस. डी. लाड, सुरेश संकपाळ, दादासाहेब लाड, खंडेराव जगदाळे उपस्थित होते.