‘एटीएम’वर गर्दी वाढली
By Admin | Updated: October 14, 2014 23:22 IST2014-10-14T22:58:53+5:302014-10-14T23:22:58+5:30
दिवाळीचा परिणाम : ग्राहकांकडून पैसे काढण्याचे प्रमाण वाढले

‘एटीएम’वर गर्दी वाढली
रमेश पाटील - कसबा बावडा ...दिवाळी सणामुळे ‘एटीएम’मधून पैसे काढण्याचे प्रमाण ग्राहकांकडून तिप्पट-चौपटीने वाढले आहे. त्यामुळे वर्दळीच्या ठिकाणी असणाऱ्या ‘एटीएम’ मशीनमध्ये रोख रकमेचा भरणा दिवसांतून दोनदा, तर काही ठिकाणी दिवसात एकदा ‘कॅश एजन्सी’ला करावा लागत आहे.
‘एटीएम’ मशीनमध्ये कॅश स्टोरेजची क्षमता १५ लाख ते २५ लाख इतकी आहे. जुन्या ‘एटीएम‘’मध्ये १५ लाखच भरणा होतो. नवीन बसवण्यात आलेल्या ‘एटीएम’ची क्षमता २५ लाखांपर्यंतची आहे. ग्राहकांची गैरसोय होऊ नये व वारंवार ‘एटीएम’मध्ये कॅश भरणा करावा लागू नये, यासाठी शक्यतो ५०० व १००० रुपयांच्या नोटांचाच जास्त भरणा केला जातो.
सध्या ‘एटीएम’मधून एका दिवशी २५ हजार इतकी रक्कम काढण्याची मुभा आहे. त्यामध्ये एकावेळी १५ हजार व नंतर १० हजार अशी २५ हजार रक्कम काढता येते. काही खासगी बॅँका एकाच वेळी ‘एटीएम’मधून ५० हजार रुपये काढण्याची ‘एटीएम’ मशीन बसवण्याच्या विचारात आहेत.
सध्या दिवाळीमुळे ‘एटीएम’ मधून पैसे काढण्याचे प्रमाण तिप्पट-चौपट वाढल्यामुळे ‘एटीएम’मध्ये कॅश भरणा करणाऱ्या कॅन एजन्सीला अधिक सतर्क राहावे लागत आहे.
दसरा सणावेळी सलग सुट्या येऊनही कॅश एजन्सीला कोणत्याही ‘एटीएम’ध्ये कॅशचा तुटवडा पडणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या.
‘एटीएम’मध्ये १००, ५००, १००० च्या नोटांचा भरणा करता येतो. पैकी बहुतेक ‘एटीएम’मध्ये १०० व ५०० च्या नोटांचाच भरणा केला जात असे; परंतु आता कॅश एजन्सीने एटीएममध्ये १ हजाराच्या नोटांचा भरणाही वाढवण्यास सुरुवात केली आहे.
जिल्ह्यात ४०० एटीएम
जिल्ह्यात ४०० हून अधिक ‘एटीएम’ सेंटर आहेत. पैकी कोल्हापूर शहरात ७५ ‘एटीएम’ची संख्या आहे. लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, राजारामपुरी, आदी परिसरात ‘एटीएम’ची संख्या जास्त आहे.
बँकांत गर्दी कमी
बॅँकांत दैनंदिन इतर व्यवहार करण्यासाठी गर्दी होत आहे. मात्र, पैसे काढण्यासाठी गर्दी होत नाही. पैसे काढण्यासाठी ‘एटीएम’चाच वापर ग्राहकांकडून जास्त होत आहे.
- एम. जी. कुलकर्णी
अग्रणी जिल्हा व्यवस्थापक, बॅँक आॅफ इंडिया.
बँकांत गर्दी कमी
बॅँकांत दैनंदिन इतर व्यवहार करण्यासाठी गर्दी होत आहे. मात्र, पैसे काढण्यासाठी गर्दी होत नाही. पैसे काढण्यासाठी ‘एटीएम’चाच वापर ग्राहकांकडून जास्त होत आहे.
- एम. जी. कुलकर्णी
अग्रणी जिल्हा व्यवस्थापक, बॅँक आॅफ इंडिया.