गव्याच्या हल्ल्याची माहिती देवूनही वनविभागाकडून चौकशी नाही - जखमीची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 19:32 IST2019-01-01T19:30:34+5:302019-01-01T19:32:40+5:30
राधानगरी-दाजीपूर मार्गावर मांडरेवाडीजवळ गव्याने मोटरसायकलला धडक दिल्याने गंभीर जखमी होऊनही दाजीपूर वन्यजीव विभागाने दखल घेतली नसल्याची तक्रार

गव्याच्या हल्ल्याची माहिती देवूनही वनविभागाकडून चौकशी नाही - जखमीची तक्रार
राधानगरी : राधानगरी-दाजीपूर मार्गावर मांडरेवाडीजवळ गव्याने मोटरसायकलला धडक दिल्याने गंभीर जखमी होऊनही दाजीपूर वन्यजीव विभागाने दखल घेतली नसल्याची तक्रार प्रकाश संभाजी जाधव (रा. मांडरेवाडी) यांनी केली आहे. दि. १२ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता राधानगरी येथून गावाकडे परत जाताना अचानक रस्त्यावर आलेल्या गव्याने जाधव यांना धडक दिली होती.
प्रकाश जाधव यांनी सांगितले कि अंधारातून अचानक गाव रस्त्यावर आला व मोटरसायकलला धडक दिली.यावेळी मानेजवळ त्याचे शिंग घुसले. डोळ्याच्या वरच्या भागातही मोठी जखम झाली. रक्तस्त्राव अधिक झाल्याने मी बेशुद्ध झालो. गावातील लोकांनी मला तत्काळ राधानगरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. दाजीपूर वन्यजीवच्या कर्मचार्यांना याची माहितीही दिली. उपचार करून दुसऱ्या दिवशी घरी आल्यावर चक्कर येवू लागल्याने कुटूंबियांनी कोल्हापुरात खासगी दवाखान्यात दाखल केले. माझी प्रकृती गंभीर होती. आठवडाभर उपचार घेण्यासाठी सुमारे साठ हजार खर्च आला.
वडील संभाजी जाधव यांनी गव्याच््या हल्ल्याबाबत दाजीपूर वन क्षेत्रपाल यांच्याकडे अर्ज दिला होता. मात्र आजपर्यंत या विभागाने याबाबत काहीच कार्यवाही केलेली नाही किंंव्हा माझी चौकशीही केलेली नाही. आमची आर्थिक स्थिती जेमतेम असल्याने उपचारासाठी झालेला खर्च कर्ज, उसने अशा प्रकारे भागवावा लागला आहे. तरी वन्यजीव विभाग दाजीपूर यांनी शासकीय मदत मिळवून द्यावी असे जाधव यांनी सांगितले.याबाबत वन्यजीव विभागाकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र येथे दूरध्वनी सेवा पुरेशी नसल्याने संपर्क होऊ शकला नाही.