Kolhapur: उमेदवारांचा नाही मेळ, त्यात पैशांचा खेळ, कशी साधायची सत्तेची 'वेळ'..?, महापालिका निवडणुकीपूर्वीच नेते त्रस्त
By भारत चव्हाण | Updated: May 13, 2025 17:42 IST2025-05-13T17:42:28+5:302025-05-13T17:42:45+5:30
भारत चव्हाण कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यातील राजकारण अनिष्ट पद्धतीने बदलून गेल्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. ...

Kolhapur: उमेदवारांचा नाही मेळ, त्यात पैशांचा खेळ, कशी साधायची सत्तेची 'वेळ'..?, महापालिका निवडणुकीपूर्वीच नेते त्रस्त
भारत चव्हाण
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यातील राजकारण अनिष्ट पद्धतीने बदलून गेल्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. विधानसभेवेळी पैशांचा खेळ मोठ्या प्रमाणात खेळला गेल्याने आता सर्वसामान्य कार्यकर्त्यांना त्याचा निवडणुकीत त्रास होणार आहे. त्यामुळे एकीकडे निवडणूक लढविणारे त्रस्त आहेत तर दुसरीकडे आघाड्यांतर्गत, पक्षांतर्गत कुरघोड्यांमुळे सर्वच पक्षांतील नेते त्रस्त आहेत.
कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक त्रिसदस्यीय किंवा चौसदस्यीय होईल, असे सांगितले जात आहे. याबाबत अजून कोणतेही निर्देश राज्य निवडणूक आयोगाकडून आलेले नाहीत. त्रिसदस्यीय प्रभाग झाला तर साधारणपणे २५ ते २६ हजार मतदारांचा एक प्रभाग राहणार आहे. एवढ्या मोठ्या संख्येच्या प्रभागात मतदारांपर्यंत पोहोचणे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना केवळ अशक्य आहे. जरी निवडणुकीला उभे राहायचे म्हटले तर खर्चही तिप्पटीने वाढणार आहे. ५० ते ६० लाख स्वत:चे जवळ असतील तरच निवडणुकीत उतरण्याचा विचार होऊ शकतो. त्यामुळे त्रिसदस्यीय प्रभाग रचनेवरूनच कार्यकर्त्यांत अस्वस्थता आहे.
दुसरीकडे पक्षीय नेते वेगळ्याच कारणांनी त्रस्त आहेत. प्रत्येक पक्षात गट, तट, कार्यकर्त्यांत, नेत्यांत मतभेद आहेत. त्याची जाणीव गेल्या काही दिवसांपासून होऊ लागली आहे. शिवसेना उद्धव सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची शासकीय विश्रामगृहावर बैठक झाली. त्यावेळी अनेक शिवसैनिकांना नेतेमंडळींमधील मतभेद आधी मिटवा, अशी हात जोडून जाहीरपणे विनंती करावी लागली. जिल्हाप्रमुख, शहरप्रमुखांची तोंडं वेगवेगळ्या दिशेला असल्याचे दिसून आले. उपनेते अरुण दुधवडकर यांनी स्पष्ट सूचना दिल्या असल्या तरी त्यात सुधारणा होण्याची शक्यता कमी असल्याने शिवसैनिकांत अस्वस्थता आहे.
भाजपमध्ये गेल्या काही वर्षांपासून मूळ भाजप आणि नंतर आलेल्यांची भाजप ही दोन वेगवेगळी सत्तास्थाने आहेत. त्यातच आता खासदार धनंजय महाडिक व आमदार अमल महाडिक यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात भाजपकडून लढण्यासाठी तयार आहेत. ताराराणी आघाडीच्या माजी नगरसेवकांनाही आता भाजप हाच एक पर्याय आहे. त्यामुळे तिकीट वाटपात महाडिकांचाच वरचष्मा राहणार असल्याने मूळ भाजपचे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. नव्या जुन्यांना सोबत घेऊन जाताना मंत्री चंद्रकांत पाटील यांना कसरत करावी लागणार आहे.
शिवसेना शिंदे गटात सत्यजित कदम यांनी विधानसभा निवडणुकीवेळी प्रवेश केला. कदम यांनी महापालिका निवडणुकीसाठी काही जोडण्या लावल्या आहेत. अन्य पक्षांतील निवडून येण्याची शक्यता असलेल्यासांठी ते फासे टाकत आहेत. परंतु शिंदे यांच्या सोबत पहिल्या दिवसापासून सोबत असलेल्या नेत्यांना व शिवसैनिकांना खटकायला लागले आहे. पक्षात निवडणूक लढण्याआधीच संघर्ष सुरू झाला आहे म्हणूनच कदम यांना आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखालीच काम करावे लागेल पण कदम यांचे तसे दिसत नाही म्हणूनच या पक्षातही अस्वस्थता आहे.
काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य
काँग्रेस पक्षातील नाराजीनाट्य तर गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. हे नाराजीनाट्य संपविण्याचा प्रयत्न सुरू झाला असला तरी त्यांचे अनेक माजी नगरसेवक तळ्यात-मळ्यात करत आहेत. काँग्रेसच्या यादीत असणाऱ्यांची नावे फुटणाऱ्यांच्या गटाशीही जोडली जाऊ लागली आहेत. त्यामुळे काँग्रेसमध्ये सगळंच काही अलबेल नाही.