वैभववाडी-गगनबावडा रस्ता दर्जेदार केला; कोल्हापूर ते कळे रस्त्याचा दर्जा ठेकेदाराने धाब्यावर बसवला

By राजाराम लोंढे | Updated: April 4, 2025 17:23 IST2025-04-04T17:23:06+5:302025-04-04T17:23:55+5:30

‘एस’, ‘यू’ टर्न बदलण्याचे आव्हान

The work of Gaganbawada should be of high quality from the beginning | वैभववाडी-गगनबावडा रस्ता दर्जेदार केला; कोल्हापूर ते कळे रस्त्याचा दर्जा ठेकेदाराने धाब्यावर बसवला

वैभववाडी-गगनबावडा रस्ता दर्जेदार केला; कोल्हापूर ते कळे रस्त्याचा दर्जा ठेकेदाराने धाब्यावर बसवला

राजाराम लोंढे

कोल्हापूर : कळे ते गगनबावड्यापर्यंतचा रस्त्यासाठी निविदा प्रसिद्ध झाली असून किमान हे काम तर चांगल्या कंपनीला देऊन कामाचा दर्जा चांगला ठेवणे अपेक्षित आहे. या रस्त्याचे काम देण्यापूर्वी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी वैभववाडी ते गगनबावडापर्यंत केलेला रस्त्याचा दर्जा पाहून यावा. सुरक्षिततेचे सगळे नियम काटेकाेर पणे पाळून रस्ता दर्जेदार केला आहे.

कोल्हापूर ते कळे रस्त्याचा दर्जा संबंधित ठेकेदाराने अक्षरश: धाब्यावर बसवला आहे. आता कळे ते गगनबावडा रस्त्याची निविदा प्रसिद्ध झाली आहे. या ३० किलोमीटर रस्त्यासाठी ३५१ कोटी मंजूर आहेत. सध्या भूसंपादनाचे काम सुरू असले तरी पावसाळ्यानंतरच प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे. ठेकेदाराची नियुक्ती करताना कोल्हापूर ते कळे रस्त्याचा अनुभव लक्षात घेणे गरजेचे आहे. सर्वाधिक तक्रारी या रस्त्याच्या कामावर झाल्या आहेत. राष्ट्रीय महामार्ग विभागाने पुन्हा तशाच चुका केल्या तर रस्त्याचे काम सुरू झाल्यापासून आंदोलनाला सुरुवात होणार आहे.

रस्त्याचा दर्जा कसा असतो? याचे उत्तम उदाहरण म्हणजे वैभववाडी ते कातळी फाटा (गगनबावडा) आहे. कोठेही रस्त्याची रुंदी कमी न करता सुरक्षितेबाबत दक्षता घेऊन रस्त्यांचे बांधकाम केेले आहे.

लहान-मोठ्या ४० मोऱ्या

कळे ते गगनबावड्यापर्यंत लहान-मोठ्या ४० मोऱ्या आहेत. नवीन रस्ता करताना कुंभी नदीच्या पुराचे पाणी, रस्त्याचा भराव या सगळ्या गोष्टींचा विचार करून मोऱ्यांची संख्या व त्यांची रुंदीही वाढवण्याची गरज आहे.

पोटातील पाणीही हलत नाही

कातळी फाटा (गगनबावडा) ते वैभववाडीपर्यंतचा रस्ता पूर्ण झाला आहे. कामाचा दर्जा अतिशय उत्कृष्ट केला आहे. या रस्त्यावरून गाडीतून जाताना पोटातील पाणीही हलत नाही, इतका चकचकीत रस्ता आहे. याउलट कोल्हापूर ते कळेपर्यंत बेडूकउड्या मारत जावे लागते.

‘एस’, ‘यू’ टर्न बदलण्याचे आव्हान

कळे ते गगनबावड्यापर्यंत तब्बल दोनशेहून अधिक वळणे आहेत. त्यातील नागमोडी वळणांची संख्या खूप आहे. तिसंगी ते साखरी येथे ‘एस’, तर साळवणच्या पुढे ‘यू’ टर्न आहेत. अशी अनेक ठिकाणे अपघात क्षेत्रे आहेत. ती बदलण्याची गरज असून त्यानुसार भूसंपादन करावे लागणार आहे.

दृष्टिक्षेपात कळे ते गगबावडा रस्ता

  • लांबी - ३० किलोमीटर
  • रुंदी - १० मीटर (दुपदरीकरण)
  • प्रकल्प किंमत - ३५१ कोटी
  • बाधित गावे - २२
  • भूसंपादन - १८ हेक्टर
  • निविदा प्रक्रिया मुदत - १७ एप्रिल

Web Title: The work of Gaganbawada should be of high quality from the beginning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.