कोल्हापूर महापालिकेतील ७२ लाखांच्या घोटाळाप्रकरणी संशयितच फिर्यादी, वादग्रस्तावर तपासाची जबाबदारी
By भारत चव्हाण | Updated: July 28, 2025 15:35 IST2025-07-28T15:34:41+5:302025-07-28T15:35:15+5:30
भ्रष्टाचाराचा छडा लावायचाय ना?

कोल्हापूर महापालिकेतील ७२ लाखांच्या घोटाळाप्रकरणी संशयितच फिर्यादी, वादग्रस्तावर तपासाची जबाबदारी
भारत चव्हाण
कोल्हापूर : बोगस कागदपत्रे सादर करून ड्रेनेजलाइन कामाचे बिल लाटल्याप्रकरणी अखेर पोलिस ठाण्यास ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल झाला. परंतु ज्यांनी एक लाख २० हजार घेतल्याचा आरोप झाला त्या कनिष्ठ अभियंता प्रज्ञा गायकवाड यांच्यावर फिर्याद देण्याची जबाबदारी सोपविणे आणि ज्यांच्यावर पूर्वी भ्रष्टाचाराचे आराेप झाले त्या शहर अभियंता रमेश मस्कर यांच्यावर संपूर्ण प्रकरणाची तपासाची जबाबदारी सोपविण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाची कुचेष्टा होत आहे. प्रशासनाच्या अशा विचित्र निर्णयामुळे चौकशीतून काय निष्पन्न होणार याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.
महानगरपालिकेतील ड्रेनेजलाइन घोटाळा शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. समाज माध्यमातूनही त्यावर मोठी चर्चा घडू लागली आहे. माजी नगरसेवक सत्यजित कदम यांनी प्रकरण बाहेर काढताच त्याची प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी गंभीर दखल घेतली. ठेकेदाराविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तसेच संबंधित प्रकरणात अडकलेल्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध नोटीस देऊन त्यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. पवडी अकाउंट्स विभाग व मुख्य लेखापरीक्षक विभागातील अकरा कर्मचाऱ्यांच्या तातडीने अन्य विभागात बदल्या केल्या.
प्रशासकांची ही भूमिका निश्चितच चांगली असली तरी त्यांनी प्रकरणाची चौकशी कोणी करावी, फिर्याद कोणी द्यावी याबाबतच्या निर्णयाबद्दल मात्र शहर परिसरात चेष्टा होत आहे. शहरातील सुजाण नागरिक महापालिकेतील कोण अधिकारी कसा आहे, त्यांची कामाची पद्धत कशी या सगळ्या गोष्टी कोणाला नाही कोणाला अनुभवायला मिळाल्या आहेत. त्यामुळे शहर अभियंता रमेश मस्कर यांच्यावर चौकशीची जबाबदारी सोपविणे आणि ज्यांच्यावर पैसे घेतल्याचा आरोप झाला त्या कनिष्ठ अभियंता प्रज्ञा गायकवाड यांना फिर्याद द्यायला सांगणे हे शहरवासीयांना चांगलेच खटकले आहे.
भ्रष्टाचाराचा छडा लावायचाय ना?
अनेक व्यवहारात जे एकमेकांचे भागीदार आहेत, तेच आरोपी आणि तेच चौकशी करणार आहेत, मग यातून निष्पन्न काय होणार..? या गैरव्यवहाराची चौकशी सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक करून करायला प्रशासक का घाबरत आहेत? मग त्यांना या प्रकरणाचा खरेच छडा लावायचा आहे की त्यावर पांघरून घालायचे आहे.? लोकांच्या करातून गोळा झालेले ८५ लाख देऊनही काम झाले आहे की नाही ते स्वतः प्रशासक जाग्यावर जाऊन का बघत नाहीत..? असे अनेक प्रश्न यामुळे निर्माण झाले आहेत.
फिर्यादीचा झाला नंतर आरोपी
यापूर्वीच्या प्रकरणात संजय भोसले यांनी महापालिकेतील घरफाळा घोटाळ्यात लक्ष्मीपुरी पोलिसांत फिर्याद दिली होती. या प्रकरणात चार अधिकाऱ्यांना अटक होऊन निलंबितही केले होते. पुढील काही दिवसांत घोटाळ्याची नवीन प्रकरणे बाहेर आली आणि फिर्यादी असलेल्या संजय भोसले यांच्यावर आरोप झाले. त्यामुळे त्यांनाही अटक झाली. आताही ड्रेनेज घोटाळ्यात त्याचीच पुनरावृत्ती होत आहे.