Kolhapur: राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याची शताब्दी वर्षाकडे वाटचाल, देशातील पहिले स्मारक
By संदीप आडनाईक | Updated: April 12, 2025 11:58 IST2025-04-12T11:57:57+5:302025-04-12T11:58:44+5:30
लोकवर्गणीतून एक लाख ४० हजार ७०० रुपये जमा झाले होते

Kolhapur: राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याची शताब्दी वर्षाकडे वाटचाल, देशातील पहिले स्मारक
संदीप आडनाईक
कोल्हापूर : देशातील पहिले स्मारक असलेल्या कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्यास शनिवार, दि. १२ एप्रिल २०२४ रोजी ९८ वर्षे पूर्ण होत आहेत. हे स्मारक येत्या दोन वर्षांत शताब्दी वर्षात पदार्पण करत असून, शताब्दी वर्षाकडे वाटचाल करत आहे. हा पुतळा आणि ऐतिहासिक दसरा चौक कोल्हापूरच्या जनतेची प्रेरणा आणि स्वाभिमानाच्या खुणा अजूनही जपतो आहे.
दसरा चौकातील या पुतळ्यासमोर दरवर्षी जयंतीनिमित्ताने शाहूप्रेमी, तसेच सर्व मंत्री जेव्हा जेव्हा कोल्हापुरात येतात, तेव्हा तेव्हा नतमस्तक होतात. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कसबा बावडा येथील लक्ष्मीविलास पॅलेस येथे झाला आणि ६ मे १९२२ रोजी त्यांचे देहावसान झाले. त्यांचे देशातील पहिले प्रत्यक्ष स्मारक त्यांचे थोरले चिरंजीव राजाराम महाराज यांनी या पुतळ्याच्या रूपातून उभारले. या पुतळ्यासाठी लोकवर्गणीतून एक लाख ४० हजार ७०० रुपये जमा झाले होते.
मुंबईचे शिल्पकार गणपतराव म्हात्रे यांनी हा ब्राँझचा पुतळा मुंबईत तयार केला. त्यासाठी ७५ हजारांवर खर्च झाला. या पुतळ्याची उंची साडेआठ फूट असून, मस्तकावर मंदील आणि अंगात मराठेशाहीचा पायघोळ अंगरखा आहे. उजव्या हातात तलवार असून, दुसरा हात झग्यामध्ये आहे. हा पुतळा रेल्वेने मुंबईतून कोल्हापुरात आणि रेल्वे स्थानकापासून दसरा चौकापर्यंत वाजत-गाजत मिरवणुकीने आणला. तत्कालीन मुंबई प्रांताचे गव्हर्नर लेस्ली विल्सन यांनी त्याचे अनावरण केले होते.
जन्मदिनांकाचा होता वाद
- शाहू महाराजांच्या जन्मदिनांकाचा वादही पूर्वी गाजला होता. पुतळ्याचे अनावरण झाले, तेव्हा शिलालेखावर जुलै असा उल्लेख आहे. मात्र, महाराजांचा जन्मदिवस २६ जून १८७४ असल्याचे अनेक पुरावे इतिहासकारांनी मान्य केले आहेत.
- या पुतळ्यावरील शिलालेखातील मजकुरामध्ये कै. छत्रपती तिसरे श्री शाहू महाराज (एल.एल.डी.जी.सी.एस.आय.) यांचा हा पुतळा कोल्हापूर राज्यातील कृतज्ञ प्रजाजनाने त्यांच्या स्मरणार्थ तयार करून नेक नामदार सर लेस्ली उईल्सन मुंबईचे गव्हर्नर यांच्या हस्ते ता. १२ एप्रिल, १९२७ दिवशी या ठिकाणी उघडला. जन्म : २६ जुलै १८७४ व मृत्यू : ६ मे १९२२ असा मराठी आणि समोरील बाजूस इंग्रजीत उल्लेख आहे.