कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) सोलापूर येथे कार्यान्वित केलेल्या सौरऊर्जा प्रकल्पातून वार्षिक ६ कोटी रुपयांची वीज बचत होणार आहे. राज्यातील सहकार व दुग्ध व्यवसायातील हा पहिला यशस्वी प्रकल्प असून, त्याचे रविवारी (दि.१६) वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे.‘गोकुळ’लावीजबिलापोटी वर्षाला कोट्यवधी रुपये खर्ची पडतात. यासाठी संघाने हळूहळू स्वत: वीजनिर्मितीकडे वळण्याचा निर्णय घेऊन स्वयंपूर्ण होण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सोलापूर येथील मालकीच्या जागेत सौरऊर्जा प्रकल्पाची पायाभरणी वर्षापूर्वी केली आणि आता त्यातून वीजनिर्मितीही सुरू झाली.ही वीज महावितरणला देणार असून, यातून संघाचे वीजबिल वजा केले जाणार आहे. या प्रकल्पातून होणारी वीजनिर्मिती पाहता वर्षाला ६ कोटी रुपयांची वीज बिलाची बचत होणार आहे. राज्यात सहकारातील हा पहिलाच प्रकल्प असून, पाच वर्षांत प्रकल्पाचा खर्च निघणार आहे.
दृष्टिक्षेपात प्रकल्प
- जागा - १८ एकर
- प्रकल्प खर्च - ३३ कोटी ३३ लाख
- वीजनिर्मिती - प्रतिदिन ६.५ मेगावॉट
पशुखाद्य कारखान्यातही सौरऊर्जा पॅनेल‘गोकुळ’ने गडमुडशिंगी व पंचतारांकित पशुखाद्य कारखान्याच्या छतावर सौरऊर्जेचे पॅनेल बसवले आहेत. यातून १.३२५ वॉट वीजनिर्मिती होते. वर्षाला दीड कोटीची वीज बचत हाेऊ लागली आहे.
सोलापूर येथील सौरऊर्जा प्रकल्पातून वीजनिर्मिती सुरू झाली असून, संघाचा ६ कोटीने वीज खर्चात बचत होणार आहे. - डॉ. योगेश गोडबोले (कार्यकारी संचालक, गोकुळ)