अपघातातील जखमी कुत्र्याची कवटी शस्त्रक्रियेने जोडली, कोल्हापुरात पहिलाच प्रयोग
By संदीप आडनाईक | Updated: May 31, 2024 12:57 IST2024-05-31T12:56:48+5:302024-05-31T12:57:35+5:30
संदीप आडनाईक कोल्हापूर : एका अपघातात चारचाकी वाहनाच्या धडकेत डोक्याच्या कवटीला इजा झाल्याने अधू झालेल्या कुत्र्यावर जरगनगर कोल्हापूर येथील ...

अपघातातील जखमी कुत्र्याची कवटी शस्त्रक्रियेने जोडली, कोल्हापुरात पहिलाच प्रयोग
संदीप आडनाईक
कोल्हापूर : एका अपघातात चारचाकी वाहनाच्या धडकेत डोक्याच्या कवटीला इजा झाल्याने अधू झालेल्या कुत्र्यावर जरगनगर कोल्हापूर येथील पशु शल्यचिकित्सक डॉ. संतोष वाळवेकर यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली. या उपचारामुळे हा कुत्रा पूर्ववत झाला असून त्याची हालचालही पूर्वीप्रमाणेच सुरू आहे. इम्प्लांटद्वारे तुटलेली कवटी जोडण्याची यशस्वी शस्त्रक्रिया कोल्हापुरात प्रथमच झालेली आहे.
करनूर (ता. कागल)च्या प्रणव पाटील यांच्या मालकीच्या या कुत्र्यास गेल्या महिन्यात चारचाकीने जोरदार धडक दिली. त्यात त्याच्या कवटीचे तसेच नाकाच्या हाडांचे दोन मोठे आणि आठ छोटे तुकडे झाले. या तुटलेल्या हाडांचे तुकडे या कुत्र्याच्या मेंदूत घुसल्याने मेंदू आणि नाकातून मोठा रक्तस्राव झाला. त्यामुळे मेंदूवरील नियंत्रण सुटल्याने त्याच्या शरीराची हालचाल अनियंत्रित झाली. मागील पायाने अधू झालेल्या आणि प्राण जाण्याच्या अवस्थेत असताना या कुत्र्यावर जरगनगर येथील पशु शल्यचिकित्सक डॉ. संतोष वाळवेकर यांनी पुढील उपचार केले.
त्यांनी या कुत्र्याच्या मेंदूत घुसलेल्या हाडांचे तुकडे व्यवस्थित बाहेर काढण्यात यश मिळविले. त्यानंतर या चार हाडांच्या तुकड्यांना बोन प्लेट् इम्प्लांट आणि एसएस वायरद्वारे जोडण्याची यशस्वी शस्त्रक्रिया केली. त्यानंतर या कुत्र्याच्या मेंदूवरील दाब कमी करून शरीराची हालचाल नियंत्रित करण्यात त्यांना यश आले. हळूहळू त्याचे मागील अधू पायही सुरळीत झाले आणि हा कुत्रा आता हिंडू फिरू लागला आहे.
अपघातामुळे अधू झालेल्या माझ्या कुत्र्याच्या मेंदूवरील ताबा सुटला होता. मरणासन्न अवस्थेतील या कुत्र्यावर डॉ. वाळवेकर यांनी केलेल्या उपचारामुळे तो पूर्ववत होऊन चालू, फिरू आणि खाऊ लागला आहे. -प्रणव पाटील, कुत्रा मालक, करनूर, ता. कागल.
प्राण्यांवर तुटलेल्या मणक्याच्या, जबड्यांच्या आव्हानात्मक शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या आहेत. अपघातात अधू झालेल्या प्राण्यांना फिजिओथेरपी आणि उपचाराद्वारे पूर्ववतही केले आहे. -डॉ. संतोष भिकाजी वाळवेकर, पशु शल्यचिकित्सक.