नितीन भगवानपन्हाळा : छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य अन् पदस्पर्शाने पावन झालेल्या पन्हाळगडावरुन जाणारी शिवज्योत प्रत्येकाच्या मनामध्ये शिवविचार जागृत ठेवेल असे प्रतिपादन आमदार डॉ. विनय कोरे यांनी केले. ते केंद्र शासन आयोजित राज्यव्यापी 'जय शिवाजी जय भारत' पदयात्रा कार्यक्रमात बोलत होते.पन्हाळगडावर ३९५ वी शिवजयंती साजरी करण्याचे भाग्य आम्हाला केंद्र शासनाच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयामुळे लाभले. गडावर असलेल्या छत्रपतींच्या मंदिरातून शिवजयंती निमित्य राज्याच्या काना कोपऱ्यातून असंख्य शिवभक्त शिवज्योती आपापल्या गावी घेऊन जातात. ही शिवज्योत प्रत्येकाच्या मनामध्ये शिवविचार जागृत ठेवेल असे आमदार डॉ.विनय कोरे म्हणाले.जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी, पन्हाळगडाचा इतिहास सांगत स्वराज्याची राजधानी असलेल्या पन्हाळगडावर छत्रपतींची ३९५ वी जयंती साजरी करण्याचा मान मिळाल्या बद्दल केंद्र शासनाचे आभार मानले. जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तीकेयन एस यांनी छत्रपती हे महाराष्ट्राचे नाहीतर संपूर्ण जगाचे युगपुरुष आहेत. मी तामिळनाडूचा असून तेथे आजही लहान मुलांना छत्रपतींच्या गोष्टी सांगितल्या जातात. मी माझ्या आईकडून छत्रपतींच्या कथा एकल्या आहेत. त्या कथा ऐकून मी मोठा झालो असे सांगत भारतीय प्रशासनिक सेवेत रुजू झाल्या नंतर मला महाराष्ट्रात येण्याची संधी मिळाली. कोल्हापूर सारख्या ऐतिहासिक ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली याचा मला अभिमान आहे असे सांगितले. 'जय शिवाजी जय भारत' पदयात्रेचे सकाळी साडेसात वाजता आमदार डॉ.विनय कोरे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तीकेयन एस यांनी ध्वज फडकावून शिवमंदिरा पासून जय शिवाजी जय भारत या पदयात्रेला सुरुवात केली. पन्हाळा व परिसरातील सोळा शाळांचे तीन हजार विद्यार्थी व मोठ्या संख्येने सहभागी झाले. दरम्यान, राष्ट्रपती पदक विजेते अयुबखान अकबर मुल्ला यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी मर्दानी खेळ, पाळणा गीत, लेझिम, लाठीकाठी बरोबरच पन्हाळगडावरील विजयालक्ष्मी भोसले, राक्षी येथील अनिरुद्ध खोत यांच्या भाषणांनी उपस्थितांची मने जिंकली. आमदार कोरे यांच्या हस्ते पन्हाळागडाची शौर्य गाथा सांगणाऱ्या पन्हाळगडाचा रणसंग्राम या लघुपटाचे अनावरण करण्यात आले. शिवमंदिरातील शिव जन्मकाळ व पाळण्याने कार्यक्रमाची सांगता झाली. पदयात्रेत सहभागी झालेल्या संजीवनची नववीतील विध्यार्थिनी भक्ती पोवार भारतमातेच्या रूपात तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशात शिक्षक बँकेचे संचालक व पोहळवाडी येथील प्राथमिक शिक्षक अमर वरुटे हे पदयात्रेचे आकर्षण ठरले.
पन्हाळगडावरुन जाणारी शिवज्योत प्रत्येकाच्या मनात शिवविचार जागृत ठेवेल : आमदार डॉ. विनय कोरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 15:39 IST