Kolhapur: भगवान महावीर अध्यासनातून उलगडणार जैन धर्माचे तत्त्वज्ञान, देशातील पहिले अध्यासन केंद्र
By पोपट केशव पवार | Updated: April 25, 2025 18:53 IST2025-04-25T18:53:13+5:302025-04-25T18:53:49+5:30
प्रयोगातून मानवी मूल्यांची पायाभरणी : संशोधनातून चिकित्सा

Kolhapur: भगवान महावीर अध्यासनातून उलगडणार जैन धर्माचे तत्त्वज्ञान, देशातील पहिले अध्यासन केंद्र
पोपट पवार
कोल्हापूर : सायंकाळी सहाच्या आत जेवण करा, जे आवश्यक आहे तेवढे घ्या, नको ते दुसऱ्यांना द्या, जीवनशैलीत कमीत कमी वस्तूंचा वापर करा हे जैन धर्माचे तत्त्वज्ञान जगभरातील नागरिकांसाठी कौतुकाचा विषय असला तरी आता हेच तत्त्वज्ञान अगदी पुराव्यानिशी संशोधन करून तौलनिकदृष्ट्या शिवाजी विद्यापीठातील भगवान महावीर अध्यासनातून मांडले जाणार आहे. महावीर अध्यासनाच्या प्रस्तावित नूतन इमारतीचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले. या अध्यासनाची ही केवळ इमारत उभी राहत नाही तर मानवी मूल्यांच्या तत्त्वज्ञानाचा पाया यानिमित्ताने रचला जाणार आहे.
विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव अध्यासनाजवळच विद्यापीठाने या इमारतीसाठी जागा दिली असून, दोन मजली इमारतीसाठी १३ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले आहे. यासाठी इमारत निधी समितीने एक कोटी ११ लाख रुपयांचा निधी देणगी स्वरूपात जमा केला. याच निधीतून पहिल्या टप्प्याचे काम करण्यात येणार आहे. या इमारतीत सभागृह, ग्रंथालय, संशोधकांसाठी खोल्या यासह विविध सुविधा असतील. उर्वरित कामासाठी शासनाकडे निधीची मागणी अध्यासनाने केली असून, तो निधी मिळाल्यानंतर पुढील काम करण्यात येणार आहे.
जागतिक दर्जाचे ध्यानकेंद्र
सध्या स्पर्धेच्या युगात अनेकजण ताणतणावाखाली आहेत. त्यामुळे ध्यानधारणा करणे क्रमप्राप्त बनले आहे. समाजाची ही गरज ओळखून या अध्यासनामार्फत जागतिक दर्जाचे ध्यानकेंद्र उभारण्यात येणार आहे.
तौलनिक संशोधनावर भर
जैन धर्माचे तत्त्वज्ञान आणि इतर धर्मांचे तत्त्वज्ञान यांचे तौलनिक संशोधन, अभ्यास या केंद्राच्या वतीने करण्यात येईल. जैन धर्माचा बौद्धिक दृष्टिकोन लक्षात घेऊन संशोधनात्मक लेखन, शिवाय तत्त्वज्ञानाची ओळख होण्यासाठी सोप्या भाषेतील साहित्य प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
त्या ७४ ग्रंथांचा होणार अभ्यास
जैन धर्मात ७४ ग्रंथ आहेत. या ग्रंथांचा बारकाईने अभ्यास करून धर्माची चिकित्सा करण्यात येणार आहे. धर्मातील चालीरीती, पूर्वपरंपरा याची सध्याच्या परिस्थितीशी तुलना करून जे चांगले आहे ते स्वीकारणे आणि ज्याची आता गरज नाही ते सोडून देणे यावर हे अध्यासन मंथन करेल.
देशातील पहिले अध्यासन केंद्र
विद्यापीठाने जागा देऊन समाजाच्या देणगीतून उभारण्यात येणारे हे देशातील पहिले केंद्र आहे. महावीर अध्यासनाची इमारत पूर्णत: इको फ्रेंडली असेल. शेजारील तलावातून येणारे वारे या इमारतीच्या सर्व खोल्यांमध्ये खेळेल अशा पद्धतीने या इमारतीचा आराखडा तयार केला आहे. २००४ साली सुरू झालेल्या अध्यासनामार्फत सध्या प्रमाणपत्र व पदविका कोर्स चालविले जातात. इमारत पूर्णत्वास गेल्यानंतर येथे पीएच.डी.सह विविध कोर्सेस सुरू करण्यात येणार आहेत.
महावीर अध्यासनाच्या नव्या इमारतीमधून आंतरराष्ट्रीय दर्जाचे जैन शास्त्रावरील संशोधन करणारे केंद्र निर्माण होणार आहे. - डॉ. विजय ककडे, संचालक, महावीर अध्यासन केंद्र, कोल्हापूर.