Kolhapur: पन्हाळा वारसा स्थळास गती, लोकवस्ती उठण्याची धास्ती
By संदीप आडनाईक | Updated: April 26, 2025 15:05 IST2025-04-26T15:03:23+5:302025-04-26T15:05:08+5:30
संदीप आडनाईक कोल्हापूर : युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत पन्हाळ गडाचा समावेश झाल्यास गडावरील लोकवस्ती उठवली जाईल, या भीतीतूनच ...

Kolhapur: पन्हाळा वारसा स्थळास गती, लोकवस्ती उठण्याची धास्ती
संदीप आडनाईक
कोल्हापूर : युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत पन्हाळगडाचा समावेश झाल्यास गडावरील लोकवस्ती उठवली जाईल, या भीतीतूनच या यादीत समावेश होण्यास पन्हाळकरांनी कडाडून विरोध सुरू केला आहे. जिल्हा प्रशासनाने स्थानिक रहिवाशांसोबत नीट सुसंवाद न केल्याने संभ्रम वाढला आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी रहिवाशांचे गैरसमज दूर करू, असे सांगून वारसा स्थळासाठी नवे कोणतेही नियम लागू होणार नाहीत असे स्पष्ट केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसाशी जोडलेल्या १२ निवडक किल्ल्यांपैकी महत्त्वाचा असलेला पन्हाळा किल्ला जागतिक वारसास्थळात समाविष्ट करण्यात येत आहे. यासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (एएसआय), महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व विभाग, वन विभाग आणि स्थानिक प्रशासनाने अधिकाऱ्यांसह युनेस्कोच्या पथकाने पन्हाळा किल्ल्याची पाहणी केली. गेल्या महिन्यात पन्हाळगडावरील १३ डी स्टुडिओच्या लोकार्पण सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. त्यानंतर पन्हाळगडावरील लोकवस्ती उठवण्यात येणार आहे, असा समज नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.
दरम्यान, तीन दरवाजा परिसरातील काही स्थानिक व्यावसायिकांना खाद्यपदार्थ आणि मनोरंजनासाठी स्वतंत्र जागा देण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे त्यांनी पन्हाळगडाचा समावेश जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट करू नये अशी भूमिका घेत विरोध केला आहे. पन्हाळगडाला दोन वेळा भेटी दिल्या आहेत. एक बैठकही बोलावली होती; परंतु रहिवाशांनी समजून घेतलेले नाही. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पन्हाळगडावर बैठकीत गैरसमज दूर करू, असे जिल्हाधिकारी येडगे यांनी सांगितले.
हे आहेत आक्षेप
- जागतिक वारसा स्थळांच्या यादीत पन्हाळ्याचे नाव निश्चित झाले, तरी ग्रामस्थांना कसलीही माहिती दिली नाही.
- तटबंदीपासून १०० मीटर अंतरावरील घरांची मालकी, माहिती जागतिक वारसा स्थळाचे अभियंता गोळा करत आहेत.
- दूरध्वनी तसेच आकाशवाणीचे मनोरे (टाॅवर) उंची जास्त होत असल्याने हलवण्यात येणार आहेत.
- जोतिबा डोंगरावर यासाठी प्रत्येकी दहा गुंठे जागा दिल्यामुळे या संशय बळावला आहे.
- पन्हाळा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उंच पाण्याची टाकी पाडण्यास सांगितले जात आहे.
- पन्हाळ्यावरील सर्व शासकीय कार्यालये वाघबीळ येथे स्थलांतरित करण्यात येणार आहेत.
पन्हाळ्याच्या रहिवाशांना कोणता फायदा होणार आणि काय नुकसान होणार याची माहिती जिल्हा प्रशासनाने लिखित स्वरूपात द्यावी आणि पन्हाळगडावर येऊन प्रत्याक्ष भेटीत खुलासा करावा.- असिफ मोकाशी, माजी नगराध्यक्ष, पन्हाळा
जिल्हाधिकाऱ्यांनी दोन वेळा पन्हाळगडाला भेट दिली. यावेळी बोलावलेल्या बैठकीत पन्हाळ्याच्या रहिवाशांना आमंत्रण नव्हते. नागरिकांच्या रहिवासाला धोका पोहोचत असेल तर पन्हाळगड युनोस्कोच्या यादीत घेऊ नये, यासाठी न्यायालयात प्रसंगी धाव घेतली जाईल. - ॲड. रवींद्र तोरसे, पन्हाळा.
पन्हाळगडावरील मूळ रहिवाशांची कोणतीही ठिकाणे ताब्यात घेतली जाणार नाहीत. उलट पर्यटनवाढीसाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. ज्यांचे अतिक्रमण आहे, ते मात्र काढले जाईल. व्यवसायाला शिस्त लावली जाईल. - अमोल येडगे, जिल्हाधिकारी, कोल्हापूर.