रविवारनंतर केव्हाही महापालिका निवडणुकांच्या घोषणेची शक्यता, प्रशासनाकडून तयारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 19:01 IST2025-12-10T19:01:01+5:302025-12-10T19:01:29+5:30
आचारसंहिता लागू होण्यापूर्वी विकासकामांचे नारळ फुटणार

रविवारनंतर केव्हाही महापालिका निवडणुकांच्या घोषणेची शक्यता, प्रशासनाकडून तयारी
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेसह राज्यातील सर्वच महानगरपालिकांच्या बहुप्रतीक्षित सार्वत्रिक निवडणुका येत्या सोमवारनंतर केव्हाही जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोग आणि राज्य शासनाच्या पातळीवर निवडणुकीची पूर्वतयारी जोरात सुरू असून, निवडणुकीची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे.
राज्यातील सर्वच महानगरपालिकांवर गेल्या चार ते पाच वर्षांपासून प्रशासक राजवट आहे. कोरोना संसर्गासह सर्वोच्च न्यायालयातील ओबीसी आरक्षणाचा मुद्दा यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुका प्रदीर्घकाळ प्रलंबित राहिल्या आहेत. सर्वच महानगरपालिकांमधून प्रशासकीय कारभाराचा बोजवारा उडाला असल्याने या निवडणुका तातडीने घेण्यात याव्यात, अशी मागणी करणाऱ्या राज्यभरातील अनेक जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या होत्या.
या याचिका निकाली काढताना सर्वोच्च न्यायालयाने दि. ३१ जानेवारीच्या आत केवळ महानगरपालिकाच नाही, तर सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात, असे आदेश दिले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यात नगरपालिका व नगर पंचायतच्या निवडणुका पार पडल्या. आता महानगरपालिकांची निवडणूक आधी घ्यायची की जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक आधी घ्यायची यावर खलबते सुरू आहेत.
एकंदरीत सर्व हालचाली पाहता महानगरपालिकांच्या निवडणुका आधी घेतल्या जातील, असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे येत्या आठ दिवसांत या निवडणुका जाहीर होतील, असे सांगितले जाऊ लागले आहे. विधीमंडळाचे अधिवेशन दि. १४ डिसेंबरअखेर संपत आहे. अधिवेशन संपताच पुढील काही दिवसांत या निवडणुकांची घोषणा होईल, अशी चर्चा सुरू आहे. सर्वच पक्षांचे नेते, पदाधिकारी या निवडणुकीच्या तयारीच्या कामात व्यस्त आहेत. राजकीय हालचालीदेखील वाढल्या आहेत.
महानगरपालिका क्षेत्रात करावयाच्या नियोजित विकासकामांचा शुभारंभ निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी करण्याच्या सूचना सरकार पक्षातील मंत्री, आमदारांना देण्यात आल्या आहेत. त्यादृष्टीने प्रशासनातील अधिकारी तसेच आमदार, मंत्री यांचीही लगबग सुरू झाली आहे. कोणकोणती कामे करावयाची आहेत त्यांची वर्क ऑर्डर येत्या काही दिवसांत देऊन त्या कामांचा शुभारंभही केला जाणार आहे. प्रशासनातील अधिकारी सध्या याच कामात व्यग्र आहेत.
मंत्री व आमदार विधीमंडळ अधिवेशन संपल्यानंतर रविवारी किंवा सोमवारी त्यांच्या-त्यांच्या मतदारसंघात पोहोचतील. त्यानंतर विकासकामांच्या शुभारंभांचे कार्यक्रम घेतले जातील. निवडणुकीच्या निमित्ताने मतदारांसमोर जाण्यासाठी ही एक मोठी संधी आहे. अधिवेशन संपल्यानंतर केंव्हाही निवडणुका जाहीर होतील असे एकूण चित्र आहे.