नेसरी : छातीत कळ आली म्हणून उपचारासाठी दवाखान्यात नेलेल्या मुलाच्या मृत्यूची बातमी समजताच आईनेही प्राण सोडला. आई व मुलाचा एका तासाच्या अंतराने झालेल्या मृत्यूच्या या घटनेने ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. ही हृदयद्रावक घटना येथील कांबळे कुटुंबीयात घडली. चंद्राबाई भैरू कांबळे (वय ८५) व संभाजी भैरू कांबळे (वय ५५) अशी माय-लेकाची नावे आहेत.साधे व प्रेमळ स्वभावाचे संभाजी हे मोलमजुरी करून कुटुंबाची गुजराण करत होते. तर, आई चंद्राबाई गेली दोन वर्षे अर्धागवायूचा झटका आल्याने अंथरुणावर खिळून होत्या. आईची सेवा संभाजी करत होता. आईचाही संभाजीवर मोठा लळा होता. सोमवारी (दि.१८) छातीत दुखू लागल्याने संभाजी यांना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. ही बातमी कळताच आईनेही देह सोडला. एकाच दिवशी माय- लेकाच्या मृत्यूची बातमी समजताच समाजासह ग्रामस्थांत हळहळ व्यक्त होत आहे. संभाजी यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी, नातू, दोन भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.
Kolhapur: मुलाच्या मृत्यूच्या धक्क्याने आईचाही मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 17:37 IST