कोल्हापूरचे सुपुत्र कवी अरुण कोलटकर यांचे स्मारक अपूर्णावस्थेतच, स्मारकाबाबत सर्वच घटकांची उदासीनता
By संदीप आडनाईक | Updated: October 31, 2025 12:21 IST2025-10-31T12:21:21+5:302025-10-31T12:21:49+5:30
निधीची कमतरता

कोल्हापूरचे सुपुत्र कवी अरुण कोलटकर यांचे स्मारक अपूर्णावस्थेतच, स्मारकाबाबत सर्वच घटकांची उदासीनता
संदीप आडनाईक
कोल्हापूर : 'जेजुरी', 'भिजकी वही' 'कलेक्टेड पोएम्स इन इंग्लिश' ‘चिरिमिरी’, ‘द्रोण’, ‘काला घोडा पोएम्स’ अशा गाजलेल्या कवितांसाठी प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कवी आणि कोल्हापूरचे सुपुत्र अरुण बाळकृष्ण कोलटकर यांचे स्मारक कोल्हापुरात उभे राहावे, अशी अपेक्षा ज्येष्ठ साहित्यिक आणि कोलटकरप्रेमींची आहे. १ नोव्हेंबर हा त्यांचा जन्मदिवस; परंतु गेली अनेक वर्षे त्यांच्या स्मारकाबाबत उदासीनता असल्याची खंत काही ज्येष्ठ साहित्यिकांनी व्यक्त केली आहे.
अरुण कोलटकर यांचे २५ सप्टेंबर २००४ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर ज्येष्ठ समीक्षक प्रा. म. द. हातकणंगलेकर यांनी तत्कालीन माजी जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांना पत्र लिहून त्यांचे स्मारक कोल्हापुरात व्हावे, अशी मागणी केली होती. देशमुख यांनी २०१२ मध्ये या पत्राची दखल घेऊन जिल्हा नियोजन मंडळामार्फत ५० लाखांची तरतूद केली. महापालिकेकडे २५ लाख सुपुर्दही केले. त्यानंतर शिवाजी पार्क येथील ७,९३४ चौरस फूट जागेवर उद्यान, सभागृह आणि कोलटकर यांची माहिती देणारे दालन असा आराखडा तयार झाला; परंतु त्या जागेला विरोध झाल्यानंतर सुर्वेनगर परिसरातील एका जागेची निवड झाली.
यासाठी डॉ. सुनीलकुमार लवटे, उदय कुलकर्णी, डॉ. रणधीर शिंदे यांच्या समितीने पाठपुरावा केल्याने तत्कालीन आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या काळात २५ लाख खर्चून एक सभागृह बांधले. मात्र अंतर्गत काम अद्यापही पैशाअभावी अपूर्ण आहे. आता ती जागा बंद अवस्थेत आहे. पालकमंत्र्यांनी आता लक्ष घालून जिल्हा नियोजनमधून आणखी रक्कम मंजूर करून हे संग्रहालय आणि स्मारक पूर्ण करावे, अशी अपेक्षा डॉ. लवटे यांनी व्यक्त केली आहे.
कोलटकरांचे कोल्हापूरशी विशेष ऋणानुबंध
कोलटकर यांचे कोल्हापूरशी विशेष ऋणानुबंध होते. त्यांचा जन्म १ नोव्हेंबर १९३२ रोजी कोल्हापुरात झाला. त्यांचे शिक्षण राजाराम हायस्कूलमध्ये मराठी माध्यमात झाले. न्यूयॉर्क रिव्ह्यू ऑफ बुक्सच्या वर्ल्ड क्लासिक्स शीर्षकांमध्ये स्थान मिळालेले कबिरांव्यतिरिक्त ते एकमेव भारतीय कवी आहेत.