कोल्हापूर : ऊस दरावरून साखर कारखानदार व शेतकरी संघटनांमधील बैठकीला मंत्रिमंडळ विस्तार आणि हिवाळी अधिवेशनाचा अडसर ठरला आहे. कारखान्यांचे बहुतांशी अध्यक्ष आमदार असल्याने त्यांना बैठकीसाठी वेळ नाही. त्यामुळे अधिवेशन जरी २१ डिसेंबरला संपणार असले तरी २४ डिसेंबरनंतरचा मुहूर्त बैठकीला लागणार आहे.मागील हंगामात गाळप झालेल्या उसाला उर्वरित प्रतिटन दोनशे रुपये व चालू हंगामातील उसाला प्रतिटन ३७०० रुपये दर द्या, अशी मागणी स्वाभिमानीसह जिल्ह्यातील शेतकरी संघटनांनी केली आहे. याबाबत प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी साखर कारखानदार व शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक सोमवारी बोलावली होती. पण, या बैठकीकडे साखर कारखानदारांनी पाठ फिरवल्याने संघटना आक्रमक झाल्या होत्या. कारखान्यांच्या अध्यक्षांसोबत दोन दिवसांत बैठक लावण्याचे आश्वासन प्रभारी जिल्हाधिकारी शिंदे यांनी दिले होते. त्यामुळे या बैठकीकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.सहा कारखान्यांचे नेते हे आमदार आहेत. त्यामुळे आगामी मंत्रिमंडळ विस्तारात ते व्यस्त आहेत. त्याचबरोबर, त्यानंतर १६ ते २१ डिसेंबरपर्यंत नागपूर येथे हिवाळी अधिवेशन आहे. त्यामुळे चर्चा होण्याची शक्यता धूसर आहे. अधिवेशन संपल्यानंतर साधारणता २४ डिसेंबरनंतरच बैठक होऊ शकते.
बैठकीनंतर आंदोलन पेटणारसाखर कारखानदारांसोबत २४ डिसेंबरनंतर बैठक होऊ शकते. बैठकीत योग्य तोडगा निघाला नाहीतर शेतकरी संघटना आक्रमक होणार आहेत. शासनाने मध्यस्थी केली नाहीतर आंदोलन पेटणार हे निश्चित आहे.