Kolhapur Politics: नेते तेच, पक्षही तेच, मात्र सोयीनुसार कोलांटउड्या

By विश्वास पाटील | Published: April 6, 2024 12:15 PM2024-04-06T12:15:23+5:302024-04-06T12:17:29+5:30

सामान्य मतदारांना मात्र या भूमिकेबद्दल तिडीक

the leaders are the same, the parties are the same, but the roles change according to convenience In the politics of Kolhapur district | Kolhapur Politics: नेते तेच, पक्षही तेच, मात्र सोयीनुसार कोलांटउड्या

Kolhapur Politics: नेते तेच, पक्षही तेच, मात्र सोयीनुसार कोलांटउड्या

विश्वास पाटील

कोल्हापूर : नेते तेच, पक्षही तेच मात्र राजकीय भूमिका मात्र बदललेल्या त्यामुळे अनेकांना वेगवेगळ्या कोलांट उड्या कशा मारायला लागत आहेत याचेच चित्र सध्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्याच्या राजकारणात पाहायला मिळत आहे. ते पाहून सामान्य माणसाची चांगलीच करमणूक होत आहे. एकदा एक गट किंवा पक्ष धरला तर किमान दोन-दोन पिढ्या त्यांच्याशी निष्ठेने राहणाऱ्या सामान्य मतदारांना मात्र या भूमिकेबद्दल तिडीक आहे.

  • जिल्ह्याचे नेते व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा गेल्या पाच लोकसभा निवडणुकीत ‘गेम चेंजर’ म्हणून सहभाग राहिला. उमेदवार ठरविण्यापासून ते जोडण्या लावण्यापर्यंत ते पायाला भिंगरी लावून फिरत असत. याचवेळेला असे घडले की लोकसभेचा उमेदवार ठरवण्याच्या प्रक्रियेपासून ते तसे अलिप्तच राहिले. त्यातही गंमत अशी की सन २००९, २०१४ आणि २०१९ या तिन्ही निवडणुकीत त्यांनी सदाशिवराव आणि संजय मंडलिक यांच्या पराभवासाठी हाडाची काडं केलीत आणि आता ते त्यांच्याच विजयासाठी रक्ताचे पाणी करणार असे म्हणत आहेत.
  • लोकसभेच्या गेल्या निवडणुकीत त्यांचा संजय मंडलिक यांना विरोध होता परंतु कार्यकर्ते त्यांच्या हातात राहिले नाहीत. कारण राष्ट्रवादीचा उमेदवाराचा पराभव हा त्यांचाही तसा छुपा अजेंडा होता
  • लोकसभेच्या २०१९ च्या निवडणूकीत आमदार सतेज पाटील यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक यांना उघड विरोध केला. स्वत:ची कार्यकर्त्यांची फळी घेऊन ते शिवसेनेच्या संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी पदरमोड करून मैदानात उतरले. आमचं ठरलंय ही टॅगलाईन काढून राज्यभर गाजवली. राजकीय विरोध किती टोकाचा असू शकतो याचेच दर्शन कोल्हापूरला झाले. त्याच मंडलिक यांच्या पराभवासाठी आता आमदार पाटील यांनी शाहू छत्रपती यांना मैदानात उतरवून पायाला भिंगरी बांधली आहे. त्यांच्यामुळे तब्बल २५ वर्षांनंतर काँग्रेसचा हात आता मतपत्रिकेवर दिसणार आहे.
  • लोकसभेच्या २००९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने ऐनवेळी संभाजीराजे यांना उमेदवारी दिली. त्यात धनंजय महाडिक यांच्या राजकीय करिअरमधील पाच वर्षे कुजली. ते गप्प बसले नाहीत. त्यांनी सदाशिवराव मंडलिक यांना ताकद दिली आणि संभाजीराजे यांच्या पराभवास हातभार लावला म्हणजे त्यांचीही पाच वर्षे वाया घालविली. पुढे २०१९ च्या निवडणुकीत संभाजीराजे यांनीही महाडिक यांच्या पराभवासाठी ताकद लावली. पुढच्या राजकारणात भाजपकड़ून संभाजीराजे यांना राज्यसभेवर पाठविण्यात आले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर संभाजीराजे यांना राज्यसभेत जाण्याची संधी होती परंतु त्यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हातात घ्यायला नकार दिला. तिथे वेगळेच राजकारण आकारास आले आणि राज्यसभेची लॉटरी भाजपकडून महाडिक यांना लागली. आता या निवडणुकीत पुन्हा हे दोघे आमने-सामने आले आहेत. संभाजीराजे शाहू छत्रपती यांच्यासाठी राबत आहेत आणि मंडलिक यांना निवडून आणण्याची जबाबदारी आता महाडिक यांच्यावरच पडली आहे.
  • राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांचे दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांच्याशी अत्यंत घरोबाचे संंबंध. मंडलिक यांच्या ‘किचन कॅबिनेट’मध्ये त्यांना स्थान. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे काम करत नसल्याच्या यादीत त्यांचेही नांव. या निवडणुकीत मात्र संजय मंडलिक यांच्या पराभवासाठी ते रात्रीचा दिवस करत आहेत.
  • लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत झाडून सारी भाजप धनंजय महाडिक यांच्या पराभवासाठी रस्त्यावर उतरली होती. आता तीच भाजप महाडिक यांच्याच नेतृत्वाखाली मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी झटणार आहे.
  • लोकसभेच्या २००९ च्या निवडणुकीत सदाशिवराव मंडलिक विरुध्द संभाजीराजे अशी लढत झाली यावेळेला शाहू छत्रपती विरुद्ध संजय मंडलिक अशी लढत होत आहे.
     

निकाल फिरवणाऱ्या टॅगलाईन..

मागच्या वीस वर्षात लोकसभेच्या निवडणुकीत ‘कौन है यह मुन्ना, कहाँ से आया है..’त्यानंतर ‘म्हातारा बैलाला घरी बसवा’ आणि ‘आमचं ठरलंय’ या टॅगलाईन निवडणुकीचा निकाल फिरवणाऱ्या ठरल्या..

Web Title: the leaders are the same, the parties are the same, but the roles change according to convenience In the politics of Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.