अतुल आंबीइचलकरंजी : शहराला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत असून, तीन ते पाच दिवसांतून एकवेळ पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीतही दूधगंगा-सुळकूडचे पाणी ढवळणार. तसेच अतिक्रमण, नदी प्रदूषण, विकास आराखडा अशा विविध मुद्द्यांवर निवडणूक गाजणार आहे. प्रामुख्याने महायुती विरूद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होण्याची शक्यता दिसत असली तरी जागा वाटपावरून संघर्ष निर्माण झाल्यास काहीजणांकडून स्वबळाचा निर्णय होऊ शकतो.इचलकरंजी महापालिकेचा पहिला महापौर आपला बनविण्यासाठी सर्वच पक्षांकडून जोर-बैठका सुरू आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे अनेक वर्षांपासूनचे विरोधक असलेले माजी मंत्री प्रकाश आवाडे व माजी आमदार सुरेश हाळवणकर एकत्र आले आहेत. त्यात आता अजित पवार गटाकडून विठ्ठल चोपडे आणि अशोक जांभळे तसेच खासदार धैर्यशील माने गटाचे रवींद्र माने हे सर्व प्रमुख शिलेदार महायुतीमध्ये एकत्र आहेत. त्यांना निवडणुकीत सामावून घेणार का, हा प्रश्न आहे. घेतल्यास आणि त्यांच्यातील जागा वाटपाचा फॉर्म्युला यशस्वी झाल्यास साहजिकच त्यांचे बळ वाढणार आहे. मात्र, जागा वाटपात समाधान न झाल्यास सर्व पक्ष स्वबळाची ताकद आजमावण्याची शक्यता आहे.दुसरीकडे कॉँग्रेसचे संजय कांबळे, शशांक बावचकर आणि राहुल खंजिरे, त्याचबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे मदन कारंडे, शिवसेना उद्धव सेनेचे सयाजी चव्हाण यांच्यासह डावे पक्ष महाविकास आघाडीमध्ये एकत्र आले आहेत. त्याला स्थानिक मॅँचेस्टर आघाडीने पाठिंबा दर्शविला आहे. या सर्वांनी एकाच चिन्हावर विरोधकांना टक्कर देण्यासाठी मोट बांधल्याचे जाहीर केले आहे. त्यांच्यामध्येही जागा वाटपावरून काही ठिकाणी वाद उत्पन्न होऊ शकतो. त्यातून मार्ग काढण्यासाठी प्रमुखांचा कस लागणार आहे.त्यामध्येही फाटे फुटल्यास पुन्हा पराभवाचा सामना करावा लागू शकतो, याची जाणीव प्रमुख नेत्यांना असल्याने अंतर्गत गटबाजी, वाद बाजूला ठेवून एकत्रित राहण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. एकंदरीत महायुती आणि महाविकास आघाडीचे घोडे जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर वेग घेणार की अडणार, हे ठरणार आहे.
स्थानिक मुद्द्यांवर निवडणूकलोकसभा, विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळाले असले तरी महापालिकेची निवडणूक ही स्थानिक मुद्द्यांवर लढवली जाते. नगरसेवकाचा जनसंपर्क, विकासकामांतील ठसा, व्यक्ती बघून मतदान होते. त्यामुळे व्यक्तीगत ताकद महत्त्वाची असून, निवडून येण्याची खात्री हाच उमेदवारीचा निकष सर्वांना ठरवावा लागणार आहे.सत्ताधारी-विरोधकांचा प्रचारगल्लीपासून दिल्लीपर्यंत एकच सत्ता असल्यास विकासाला गती मिळेल, असा प्रचार सत्ताधारी पक्षाकडून होईल, तर पाणी प्रश्नासह अन्य स्थानिक प्रश्न, अडचणी या मुद्द्यांवर घेरून विजय मिळविण्यासाठी विरोधक प्रयत्न करतील. प्रचारातील ठळक मुद्दे
- इचलकरंजीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न
- विकासकामांतील टक्केवारीचा विषय
- महापालिकेत लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप
- रस्त्यांच्या निधीचा मुद्दा
- आयजीएम रुग्णालयाचा प्रश्न
- शहर विकास आराखडा
- अतिक्रमणाचा विषय
- विकासकामांमध्ये समन्वयाचा अभाव
पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना नेहमीच वणवण करावी लागत आहे. निवडून येणाºयांनी प्राधान्याने पाण्याचा प्रश्न सोडवणे अपेक्षित आहे. - गंगा जाधव - गृहिणी, कुंभार गल्ली, इचलकरंजी.निवडणुकीपुरते मुद्दे घेऊन राजकीय व्यक्ती निवडणुकीनंतर त्याकडे दुर्लक्ष करतात. याचे उदाहरण म्हणजे शहरातील रस्त्यांची कामे आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यांच्या कामांबद्दल तक्रारी होत आहेत. असे न होता सर्वच कामे दर्जेदार व्हावीत. - अमित पंजवाणी - दुकानदार, इचलकरंजी.
महापालिका स्थापना २९ जून २०२२
- एकूण सदस्य - ६५
- पुरूष सदस्य - ३२
- महिला सदस्य - ३३ (खुला प्रवर्ग २०)
- अनुसूचित - ५ (३ महिला २ पुरूष)
- ओबीसी - १७ (९ महिला ८ पुरूष)
- स्वीकृत सदस्य - ५
मागील नगरपालिकेचे पक्षीय बलाबल
- भाजप - लोकनियुक्त नगराध्यक्ष १ + १४ सदस्य + १ स्वीकृत. एकूण - १५
- कॉँग्रेस + (प्रकाश आवाडे गट) - १८ + १ स्वीकृत
- ताराराणी आघाडी (सागर चाळके) - ११ + १ स्वीकृत
- राष्ट्रवादी (अशोक जांभळे) - ७+१ स्वीकृत
- राजर्षी शाहू आघाडी (मदन कारंडे) १०+१ स्वीकृत
- शिवसेना - १
- अपक्ष - १
लोकसंख्या (सन २०११ जनगणना)एकूण - २ लाख ९२ हजार ६०अनुसूचित जाती- २६ हजार ५०४अनुसूचित जमाती - १८ हजारएका प्रभागातील लोकसंख्या - ९ हजार २७
लोकसंख्या - सन २०२१ च्या जनगणनेनुसार (२० टक्के वाढ धरून)एकूण - ३ लाख ५० हजारएका प्रभागातील लोकसंख्या - १० हजार ९३८.
Web Summary : Ichalkaranji's upcoming municipal elections will revolve around the persistent water scarcity issue, along with topics like encroachments and development plans. Alliances are forming, but seat-sharing arrangements will determine the strength and unity of each front.
Web Summary : इचलकरंजी के आगामी नगर पालिका चुनाव पानी की कमी, अतिक्रमण और विकास योजनाओं जैसे मुद्दों के आसपास होंगे। गठबंधन बन रहे हैं, लेकिन सीटों का बंटवारा प्रत्येक मोर्चे की ताकत और एकता का निर्धारण करेगा।