खासदार माने-आवाडे यांच्यात रंगले कुरघोडीचे राजकारण; लोकसभेच्या तोंडावर चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2024 12:21 PM2024-03-09T12:21:56+5:302024-03-09T12:24:04+5:30

दोन्ही नेते महायुतीचे घटक असताना प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे एकमेकांवर करत असलेल्या कुरघोड्या मतदारसंघात चर्चेचा विषय ठरल्या

The dispute between MP Darhysheel Mane and MLA Prakash Awade is not over | खासदार माने-आवाडे यांच्यात रंगले कुरघोडीचे राजकारण; लोकसभेच्या तोंडावर चर्चेला उधाण

खासदार माने-आवाडे यांच्यात रंगले कुरघोडीचे राजकारण; लोकसभेच्या तोंडावर चर्चेला उधाण

कोल्हापूर : खासदार धैर्यशील माने आणि आमदार प्रकाश आवाडे यांच्यातील शीतयुद्ध काही केल्या संपायला तयार नसल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने हे जगजाहीर झाले आहे. एकमेकांवर कुरघोडी करण्याचे राजकारण ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्यात सुरू झाले आहे.

आमदार आवाडे यांनी गेल्या आठवड्यात शिरदवाड (ता.शिरोळ) येथील कार्यक्रमात लोकसभेचा उमेदवार बदला असे मी नव्हे तर लोकच म्हणत असल्याची टीका जाहीरपणे केली होती. त्याला खासदार माने यांनी संयमी उत्तर दिले. घटक पक्षांची जागेची मागणी असणे गैर नाही. परंतु, जेव्हा उमेदवार जाहीर होईल तेव्हा सर्वजण एकाच व्यासपीठावर असतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला होता. परंतु, त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या स्वागताच्या जाहिरातीत मात्र स्थानिक आमदार असूनही आवाडे यांचे छायात्रित वापरलेले नाही. 

अगदी विनय कोरे, राजेंद्र यड्रावकर यांच्यापासून प्रकाश आबिटकर यांच्यासह तबब्ल १३ नेत्यांची छायाचित्रे आवर्जून वापरली आहेत, परंतु त्यात आवाडे यांच्या छायाचित्रासाठी मात्र जागा मिळालेली नाही. इचलकरंजीजवळ कार्यक्रम असून आवाडे यांचा छायाचित्र वगळण्याचे धाडस खासदार माने यांनी केले आहे.

त्याचा वचपा लगेचच आमदार आवाडे यांनीही काढला आहे. त्यांच्या प्रयत्नांतून इचलकरंजीला एमएच-५१ हा नवा नंबर परिवहन विभागाने दिला आहे. त्याच्या जाहिराती आमदार आवाडे यांनी शुक्रवारच्या वृत्तपत्रांत केल्या आहेत. त्यांनीही त्यामध्ये जाणीवपूर्वक खासदार माने यांचे छायाचित्र वगळले आहे. हे दोन्ही नेते महायुतीचे घटक असताना लोकसभेची निवडणूक कधीही जाहीर होईल अशी स्थिती असताना प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे एकमेकांवर करत असलेल्या कुरघोड्या मतदारसंघात चर्चेचा विषय ठरल्या आहेत. या मतदारसंघातून आमदार आवाडे यांचे चिरंजीव राहुल हे लोकसभेसाठी इच्छुक असल्याने तो संदर्भ या राजकारणाला आहे.

Web Title: The dispute between MP Darhysheel Mane and MLA Prakash Awade is not over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.