इचलकरंजी : महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारी यादीवर मुंबईत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत शिक्कामोर्तब करण्यात आला. ९५ टक्के उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली असून, ५ टक्के जागांवर तांत्रिक अडचण आहे. येत्या दोन दिवसांत इचलकरंजीत पत्रकार परिषद घेऊन निश्चित झालेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे.भाजपची यादी निश्चित करण्यासाठी मुंबईत चव्हाण यांच्या निवासस्थानी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आणि आमदार राहुल आवाडे, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, माजी मंत्री प्रकाश आवाडे, संघटन मंत्री मकरंद देशपांडे, जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर यांच्यासमवेत बैठक झाली. या बैठकीमध्ये यादीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.९५ टक्के जागांवर आवाडे व हाळवणकर गटाचे एकमत झाले. त्या जागांवर कोणाचीही तक्रार नाही. मात्र, ५ टक्के जागांवर तांत्रिक अडचणीमुळे एकमत झालेले नाही. सहयोगी पक्षांनाही त्यातील जागा देण्यात येणार असल्याने त्या जागांवर नंतर निर्णय घेण्यात येणार आहे.
मुंबईत निश्चित केलेल्या उमेदवारांची यादी इचलकरंजी पत्रकार कक्षात येत्या दोन दिवसांत आवाडे व हाळवणकर एकत्रितरित्या जाहीर करणार आहेत. या यादीकडे भाजपकडून उमेदवारी मागितलेल्या सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. कोणाला उमेदवारी मिळते व कोणाचा पत्ता कट होतो, हे येत्या दोन दिवसांमध्ये समजणार आहे.
शिव-शाहू आघाडीची यादी दोन दिवसांतशिव-शाहू विकास आघाडीनेही कासव चालीने आपले उमेदवार निश्चित केले आहेत. त्यांच्याही बैठका सुरू आहेत. येत्या दोन दिवसांत त्यांची यादीही जाहीर होणार आहे.
प्रचाराला लागण्याच्या सूचनामुंबईतील बैठकीत ज्यांची नावे निश्चित झाली आहेत, त्या उमेदवारांना स्वत: आमदार राहुल आवाडे तसेच भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर हे फोन करून प्रचाराला लागण्याच्या सूचना देत आहेत. ज्यांना उमेदवारी मिळाली आहे, त्यांच्यात उत्साहाचे वातावरण आहे. अनेकांनी आपल्या घरासमोर फटाके उडवून उमेदवारी मिळाल्याचा आनंद व्यक्त केला.
आवाडे व आमच्यामध्ये कोणतेही मतभेद नाहीत. दोघांनी बसून यादीतील नावे निश्चित केली आहे. महायुतीतील सहयोगी पक्षासंदर्भातील निर्णय घेतला जाईल. - सुरेश हाळवणकर, प्रदेश उपाध्यक्ष भाजप