कोल्हापूरच्या प्रवेशद्वारावरील कमान आज पाडणार, वाहतूक मार्गात करण्यात आला बदल.. जाणून घ्या
By भारत चव्हाण | Updated: November 6, 2025 14:45 IST2025-11-06T14:43:41+5:302025-11-06T14:45:04+5:30
कमानीचे स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर ती उतरवण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला आहे

संग्रहित छाया
कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या तावडे हॉटेल जवळची स्वागत कमान आज, गुरुवारी रात्री १० वाजल्यापासून सकाळी ६ वाजेपर्यंत महानगरपालिकेच्या वतीने पाडण्यात घेण्यात येणार आहे.
कोल्हापुरात येणाऱ्या भाविक, पर्यटक, प्रवाशांचे स्वागत करण्यासाठी उभारलेली ही कमान गेल्या काही दिवसापासून धोकादायक बनली होती. त्याच्या भिंतीना, स्लॅबना, कॉलमला तडे गेले आहेत. ती केव्हाही कोसळण्याचा धोका होता. या कमानीचे स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर ती उतरवण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला आहे.
कमान पाडण्यात येणाऱ्या कालावधीमध्ये वाहतूक पोलिसांच्या मदतीने तावडे हॉटेल मार्गे कोल्हापुरात येणारी वाहतूक उचगाव मार्गे वळविण्यात येणार आहे. तसेच कोल्हापूर शहरातून तावडे हॉटेल मार्गे बाहेर जाणारी वाहतूक छत्रपती ताराराणी चौकातून बावडा रोडने शिये मार्गे वळवण्यात येणार आहे.
तरी या कालावधीमध्ये कोल्हापूर शहरात येणाऱ्या व शहरातून बाहेर जाणाऱ्या नागरिकांनी वाहतूक व्यवस्थेत केलेल्या बदलाची नोंद घेऊन प्रशासना सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेले आहे..