वस्त्रोद्योगास चांगली स्थिती निर्माण होईल

By Admin | Updated: March 9, 2017 00:35 IST2017-03-09T00:35:55+5:302017-03-09T00:35:55+5:30

नरेशकुमार : इचलकरंजीत बायर-सेलर मीट सुरू

Textile industry will create a good condition | वस्त्रोद्योगास चांगली स्थिती निर्माण होईल

वस्त्रोद्योगास चांगली स्थिती निर्माण होईल

इचलकरंजी : टेक्स्टाईल हे वाढणारे क्षेत्र आहे. हा व्यवसाय कधीही घटत नाही. दिवसेंदिवस कापडाच्या वापराची संख्या वाढत आहे. येणाऱ्या काळात या व्यवसायाला चांगली परिस्थिती निर्माण होईल, असे सांगत यंत्रमागधारकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन टेक्स्टाईल कमिशनर रिजनल आॅफिसचे संचालक नरेशकुमार यांनी केले.
येथील यशोलक्ष्मी कार्यालयात भरविण्यात आलेल्या वस्त्रोद्योग क्षेत्रातील बायर-सेलर मीट आणि सेमिनार २०१७ या कार्यक्रमात ते बोलत होते. रिजनल आॅफिस आॅफ टेक्स्टाईल कमिशनर नवी मुंबई, पॉवरलूम डेव्हलपमेंट व एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल (पीडीएक्सएल), वस्त्रोद्योग मंत्रालय भारत सरकार आणि येथील रोटरी क्लब आॅफ इचलकरंजी सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.
नरेशकुमार म्हणाले, वस्त्रोद्योगासाठी शासनाच्यावतीने नवीन यंत्रमागासाठी टफ्स, तर जुन्या यंत्रमागाच्या अत्याधुनिकीकरणासाठी इनसीटू अशा योजना सुरू आहेत. यंत्रमागधारकांनी अशा योजनांचा लाभ घ्यावा. साध्या यंत्रमागधारकांना या योजनेमधून आधुनिकीकरणासाठी अनुदान मिळते. सात वेगवेगळ्या जोडण्या करून साध्या मागाला अत्याधुनिक करता येते. वस्त्रोद्योग क्षेत्रातील अन्य ठिकाणांपेक्षा इचलकरंजी या योजनेसाठी अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. माजी मंत्री प्रकाश आवाडे म्हणाले, शहरात सध्या दररोज दोन कोटी मीटर कापड उत्पादन केले जाते. यातून सुमारे ८० कोटी रुपयांची उलाढाल होते. तसेच या कापड उत्पादनासाठी आवश्यक असणारे अत्याधुनिक प्रोसेसर्स आगामी काळात केंद्र सरकारच्या योजनेतून सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये एक लाख २५ हजार मीटर कापड दररोज अत्याधुनिक पद्धतीने प्रोसेस केले जाणार आहे. तसेच अत्याधुनिक प्रकारच्या तीन सायझिंग आणि सर्वच सुविधायुक्त असे मार्केटींग सेंटर लवकरच निर्माण करण्यात येणार आहे. त्यामुळे वस्त्रोद्योगाला येणाऱ्या काळात झळाळी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच शहरातील उत्पादक किमान ५० टक्के कापड स्वत:च्या नावाने एक्स्पोर्ट करायला पाहिजे. सध्या शहरातील बहुतांश कापड एक्स्पोर्ट केले जाते. मात्र, येथून खरेदी करून अन्य कंपन्यांच्या नावे बाहेर पाठविले जाते. शहरात कमीत कमी किमतीपासून ते जास्तीत जास्त किमतीपर्यंतचे कापड आवश्यकतेनुसार उत्पादन करून घेण्याची ताकद असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी आनंद कुलकर्णी, रिजनल आॅफिसचे दिनेश राणे, शशांक पांडे, पीडीएक्सएलचे पुरूषोत्तम वंगा, सुनील पाटील, विश्वनाथ अग्रवाल, गजानन होगाडे, रोटरीचे हिराचंद बरगाले, हसमुख पटेल, अमर डोंगरे, आदी प्रमुख उपस्थित होते. (वार्ताहर)


वेगवेगळ्या उत्पादनांचे तीस स्टॉल
हातरुमालापासून ते उत्कृष्ट क्वॉलिटीचे शुटींग-शर्टींग, ड्रेस मटेरियल, पडदे, तयार उत्पादने अशा अनेक उत्पादनांचे तीस स्टॉल या प्रदर्शनात लावण्यात आले आहेत. खरेदीसाठी देशातील विविध ठिकाणांहून व्यापारी भेट देण्यासाठी आले आहेत.
३२ हजार नमुन्यांमध्ये उत्पादने
शहरातील आर. के. ग्रुपच्यावतीने वेगवेगळ्या ३२ हजार नमुन्यामध्ये उत्पादने घेतली जातात. त्यासाठी २३२ काऊंटचे आठ हजार १० रुपये किलो अशा किमती सुताचा वापर केला जातो. तसेच या ग्रुपच्यावतीने खास क्वॉलिटी डेव्हलपमेंट(उत्पादन नियमितीकरणा) साठी दोन यंत्रमाग नियमितपणे चालविले जातात, अशी माहिती माजी मंत्री आवाडे यांनी आपल्या भाषणामध्ये दिली.

Web Title: Textile industry will create a good condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.