इचलकरंजी : सद्यस्थितीत अडचणीत असलेल्या वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी ठोस अशी कोणतीच घोषणा केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली नाही. त्यामुळे वस्त्रोद्योग क्षेत्राचा अपेक्षाभंग झाला आहे. परंतु देशभरात नव्याने सात ठिकाणी टेक्स्टाईल हब तयार करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे थोड्या संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
केंद्र सरकार सत्तेत आल्यापासून वस्त्रोद्योग व पर्यटनाला चालना देणार असल्याची घोषणा करीत होते. त्यामुळे दरवर्षी अर्थसंकल्पाकडे लक्ष लागलेले असते. यंदा गेल्या काही वर्षातील वस्त्रोद्योगाची बिकट परिस्थिती पाहता, विविध वस्त्रोद्योग क्षेत्रातील संघटनांनी केलेल्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून काहीतरी भरीव तरतूद केली जाईल, अशी अपेक्षा होती. परंतु त्या मागण्यांबद्दल घोषणा झाली नसल्याने त्यांच्या पदरी निराशा पडली आहे. सात ठिकाणी नवीन टेक्स्टाईल हब निर्माण करणार असल्याचे सांगितले असले, तरी त्यात महाराष्ट्राला कितपत फायदा होईल, हे अद्याप अस्पष्ट आहे.
प्रतिक्रिया
कोरोनामुळे सर्वत्र अस्थिरतेचे वातावरण असताना, केंद्रीय अर्थसंकल्पात जनतेच्या आशा-आकांक्षाची पूर्तता करण्याच्यादृष्टीने समतोल राखला आहे. वस्त्रोद्योगाच्या मेगा इन्व्हेस्टमेंट पार्क (मित्रा) निर्मितीची घोषणा वस्त्रोद्योगाला चालना देणारी आहे.
सुरेश हाळवणकर, भाजप प्रदेश उपाध्यक्ष
वस्त्रोद्योगाच्या बिकट परिस्थितीचा गांभीर्याने विचार होईल, असे वाटले होते. परंतु आम्ही संघटनांच्यावतीने केलेल्या मागण्या बाजूलाच राहिल्या आहेत. चालू वस्त्रोद्योगाला चालना देण्याचे सोडून नव्या वस्त्रोद्योगाची उभारणी करण्याची घोषणा केली आहे. तीन वर्षात पहिल्यांदाच टेक्स्टाईल विभागाचे नाव अर्थसंकल्पात आले.
विनय महाजन, अध्यक्ष - यंत्रमागधारक जागृती संघटना