इंधन दरवाढीमुळे वस्त्रोद्योगाची वाट बिकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:22 IST2021-03-06T04:22:15+5:302021-03-06T04:22:15+5:30
अतुल आंबी लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : पेट्रोल- डिझेलच्या दरवाढीमुळे वस्त्रोद्योगातील तयार झालेले कापड, कच्चा माल व सूत ने-आण ...

इंधन दरवाढीमुळे वस्त्रोद्योगाची वाट बिकट
अतुल आंबी
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : पेट्रोल- डिझेलच्या दरवाढीमुळे वस्त्रोद्योगातील तयार झालेले कापड, कच्चा माल व सूत ने-आण करण्यासाठी वाहतुकीचा दर वाढत आहे. परिणामी, उत्पादन खर्चातही वाढ होत आहे.
शहरातील पाली- बालोत्रा, अहमदाबाद, मुंबई, तसेच कोईमतूर, तामिळनाडू, आंध्र प्रदेश अशा शहरांमध्ये नियमित वाहतूक सुरू असते.
वस्त्रोद्योगासाठी लागणारा मुख्य घटक सूत हे दक्षिण भारतातून इचलकरंजीत येते. त्यापासून आडवा व उभा धागा बनण्यासाठी सायझिंगला नेले जाते. तेथून यंत्रमागावर तो विणला जातो. विणून तयार झालेल्या ग्रे कापडावर प्रक्रिया करण्यासाठी शहरात, तसेच पाली-बालोत्रा, कोईमतूर अशा दूरच्या ठिकाणी नेले जाते. त्यानंतर पूर्ण तयार झालेले कापड काही व्यापारी तेथूनच मुंबई, कोलकाता बाजारपेठांकडे पाठवितात, तर काही परत शहरात मागवून त्यापासून गारमेंटमध्ये कपडे तयार केले जाते, तसेच साडीफॉल, टॉवेल, नॅपकीन, रुमाल बनविले जातात. ते पॅकिंग करून विक्रीसाठी पुन्हा बाहेरच्या बाजारपेठांमध्ये जातात. या सर्व उठाठेवींसाठी प्रत्येक प्रक्रियेनंतर लहान- मोठ्या टेम्पोपासून ते सोळाचाकी ट्रकपर्यंत वाहनांची दररोज आवश्यकता भासते. सूत मिलमधून सूत मागविण्यासाठीही ट्रक ठरलेले असतात. या सर्व वाहतुकीचा खर्च धरूनच उत्पादन खर्च निश्चित केला जातो. त्यात या तीन महिन्यांत दररोज वाढत चाललेल्या पेट्रोल- डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वांचेच गणित कोलमडत आहे. वाहनधारक मिळणाऱ्या भाड्यात परवडत नाही, म्हणून वाढीव मागणी करीत आहेत.
चौकटी
ट्रान्स्पोर्ट असोसिएशनही भाडेवाढीच्या पवित्र्यात
ट्रान्स्पोर्ट असोसिएशनच्या बैठकीत भाडेवाढीवर चर्चा करून अखेर पालीला कापड गाठी घेऊन जाणाऱ्या भाड्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. शहरातून दररोज किमान २० वाहने जातात. त्यानंतर बालोत्रा, अहमदाबाद भाडेवाढीचाही निर्णय होणार आहे. शहरातून बालोत्र्याला चौदा टायर, बारा टायर ट्रक, तर अहमदाबादला सोळा टायर ट्रक जातात. सर्वांच्या भाड्यामध्ये वाढ करण्याबरोबरच एक महिन्याचे पेमेंट १५ दिवसांच्या साइटवर आणण्याचेही ठरविण्यात आले, अशी माहिती अध्यक्ष अशोक शिंदे व सचिव जितेंद्र जानवेकर यांनी दिली.
सूत वाहतूक परवडेना
शहरात कोईमतूरसह दक्षिण भारतातून सूत घेऊन येणाऱ्या बारा व चौदाचाकी ट्रकवाल्यांनाही वाहतूक परवडेनाशी झाली आहे. एका फेरीला दहा दिवसांचा कालावधी जातो. येताना ४ हजार ५००, जाताना ४ हजार ५००, असा नऊ हजार रुपये टोल, सात हजार रुपये जेवण खर्च, तीन हजार रुपये हमाली, अशी रक्कम जाते.
कोट....
सूत उतरविण्यासाठी शहरात आल्यानंतर एकाच ठिकाणी न उतरविता शहरांतर्गत विविध ठिकाणी फिरावे लागते. परिणामी, त्याचा डिझेल खर्च अधिक होतो. त्यामुळे ५०० रुपये वाढीव दिले, तर परवडते; अन्यथा नुकसान होते.
-सिल्व्हर राज, ट्रकचालक
फोटो ओळी
०५०३२०२१-आयसीएच-०४
कोईमतूरहून सुताची बाचकी घेऊन इचलकरंजीत उतरविण्यासाठी आलेले ट्रक. (छाया : उत्तम पाटील)