कोल्हापूर - टीईटीच्या पेपरफुटीप्रकरणी अटक केलेल्या महेश गायकवाड टोळीने टीईटीसह सेट (राज्य प्राध्यापक पात्रता) परीक्षेतही पेपर फोडल्याची कबुली दिली. प्रत्येकी तीन लाख रुपये घेऊन त्यांनी सेटच्या २५ व टीईटीच्या २५ ते ३० परीक्षार्थींना पेपर दिल्याचे चौकशीतून समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी कोल्हापूरसह सांगली आणि सातारा या जिल्ह्यांंतून आणखी १० जणांना सोमवारी अटक केली.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेतल्या जाणाऱ्या टीईटीची प्रश्नपत्रिका फोडण्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा मुख्य सूत्रधार महेश भगवान गायकवाड (रा. बेलवाडी, ता. कराड, जि. सातारा) याच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. २०२३ मध्ये झालेल्या टीईटी आणि सेट परीक्षेची प्रश्नपत्रिका फोडून ५० ते ६० परीक्षार्थींना ती पुरवल्याची कबुली त्याने दिली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याकडून तीन लाख रुपये घेतल्याचेही त्याने सांगितले. एजंट, परीक्षार्थींचीही नावे समोर आली आहेत. त्यावरून पोलिसांनी सोमवारी १० जणांना अटक केली.
टीईटी प्रकरणात अटकेतील गायकवाड बंधूंकडून सातारा जिल्ह्यातील बेलवाडी (ता. कराड) येथे जय हनुमान करिअर ॲकॅडमी चालवली जाते.फोडलेले पेपर घेऊन टीईटी आणि सेट परीक्षा दिलेले बहुतांश परीक्षार्थी परीक्षांमध्ये पास झाले आहेत. विशेष म्हणजे त्यातील काही शिक्षक, प्राध्यापक अनेक जिल्ह्यांत सध्या सेवेत आहेत. त्यांची यादी पोलिसांना मिळाली असून, त्यांनाही आरोपी केले जाईल.
उपअधीक्षक क्षीरसागर यांच्याकडून तपास गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी या प्रकरणाचा तपास करवीरचे पोलिस उपअधीक्षक सुजित क्षीरसागर यांच्याकडे सोपविला आहे. पेपर फोडणाऱ्यांसह एजंट, परीक्षार्थी आणि झेरॉक्स काढणाऱ्यांवरही कारवाई होईल, अशी माहिती तपास अधिकारी क्षीरसागर यांनी दिली.