‘पाणीपुरवठा’च्या निविदा नियमबाह्य

By Admin | Updated: February 13, 2015 23:48 IST2015-02-13T23:44:40+5:302015-02-13T23:48:52+5:30

जिल्हा परिषद सभा : सदस्यांचा गौप्यस्फोट, धैर्यशील मानेंनी काढले प्रशासनाचे वाभाडे

The tender order for 'water supply' is out of order | ‘पाणीपुरवठा’च्या निविदा नियमबाह्य

‘पाणीपुरवठा’च्या निविदा नियमबाह्य

कोल्हापूर : जिल्ह्णातील शंभरांवर गावांच्या लाखो रुपयांच्या पाणीपुरवठा योजनांच्या निविदा जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने नियमबाह्णपणे काढल्या आहेत. ज्या गावांच्या निविदा निघाल्या आहेत, त्यांचे सरपंच, ग्रामसेवक, अन्य पदाधिकारी यांना अंधारात ठेवले आहे, असा गौप्यस्फोट धैर्यशील माने यांनी शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत केला. कडक शब्दांत वाभाडे काढत त्यांनी प्रशासनाच्या कारभाराचा पंचनामा केला.
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा अध्यक्ष विमल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ)अविनाश सुभेदार यांनी प्रशासनाची बाजू सांभाळली.
माने म्हणाले, पाणीयोजनेच्या कामाची निविदा काढताना पाणीपुरवठा विभागाने शासनाचे सर्व नियम डावलले आहेत. चंदगड तालुक्याच्या गावातील निविदा आजरा तालुक्यातील ग्रामपंचायतीने काढली आहे. निविदा काढताना संबंधित गावातील सरपंच, ग्रामसेवक यांना सामावून घ्यावे, असा शासनाचा नियम आहे. असे असताना ग्रामपंचायतीला अंधारात ठेवले आहे. योजना पूर्ण झाल्यानंतर तक्रार झाल्यानंतर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. तक्रार झाल्यानंतर कनिष्ठ अधिकाऱ्यांना पुढे केले जाते आणि वरिष्ठ सहीसलामत सुटतात; त्यामुळे नियमबाह्ण निविदेची बाब गंभीर आहे.आजऱ्याचे सभापती विष्णुपंत केसरकर म्हणाले, आमच्या तालुक्यातील पाणीयोजनेच्या निविदा चंदगड तालुक्यातील ग्रामपंचायतींनी काढल्याचे आता ऐकून दु:ख होते. फेरनिविदा काढाव्यात. राहुल देसाई म्हणाले, निविदा ग्रामपंचायती काढत नसून ठेकेदार काढत आहेत. यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा काय करीत आहे? पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एन. बी. भोई यांनी केवळ दोन ते तीन गावांतच असे झाले आहे, असे उत्तर देत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
अतिरिक्त शिक्षकांना सामावून न घेणाऱ्या संस्थेतील सर्वच शिक्षकांचे पगार थांबवावेत, अशी मागणी एकनाथ पाटील यांनी केली. शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी ९१ शिक्षकांना सामावून घेतलेले नाही. संबंधित संस्थांना नोटीस काढली आहे. शासनाच्या नियमानुसार कारवाई होईल, असे सांगितले.
अरुण इंगवले म्हणाले, शासनाने निश्चित केलेल्या कंपनीच्या सायकली स्वनिधीतून दिल्या जातात. त्या निकृष्ट दर्जाच्या असतात. त्यामुळे नामांकित कंपनीच्या सायकली लाभार्थ्याला द्याव्यात, अन्यथा रोख पैसे द्यावेत. यावर मुख्य लेखाधिकारी गणेश देशपांडे यांनी नियमानुसार शासनाने निश्चित केलेल्या कंपन्यांच्याच सायकली घेणे बंधनकारक आहे, असे सांगितले. शेवटी सीईओ सुभेदार यांनी तोडगा काढला. ते म्हणाले, दोन ज्येष्ठ सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष यांची समिती स्थापन करून कोणत्या कंपनीच्या सायकली घ्यायच्या, हे निश्चित केले जाईल.


केजरीवालांचेही अभिनंदन...
दिल्लीत दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान होणारे अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन करण्यासाठी माने उठले. त्यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या. काही सदस्य हसलेही. याचा वेध घेत सर्वसामान्य असे केजरीवाल यांनी निवडणुकीत चांगले यश मिळविले तर अभिनंदन का करायचे नाही? असाही मिश्किल टोलाही माने यांनी लगावला.
सभागृहाचे उद्घाटन
विस्तारीकरण आणि नूतनीकरण झालेल्या सभागृहाचे उद्घाटन अध्यक्षा पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी अधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Web Title: The tender order for 'water supply' is out of order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.