तरुणाईचा भन्नाट जल्लोष --महोत्सवाला स्पर्धा नव्हे, संधी समजा

By Admin | Updated: October 7, 2014 23:38 IST2014-10-07T23:35:49+5:302014-10-07T23:38:13+5:30

शिवाजी विद्यापीठ : जिल्हास्तरीय युवा महोत्सवास उत्साही वातावरण सुरुवात, युवक-युवतींची गर्दी

Teenage youth celebrations - Not a competition for the festival, but the opportunity | तरुणाईचा भन्नाट जल्लोष --महोत्सवाला स्पर्धा नव्हे, संधी समजा

तरुणाईचा भन्नाट जल्लोष --महोत्सवाला स्पर्धा नव्हे, संधी समजा

महोत्सवाला स्पर्धा नव्हे, संधी समजा
शिवाजी विद्यापीठ : जिल्हास्तरीय युवा महोत्सवास उत्साही वातावरण सुरुवात, युवक-युवतींची गर्दी

कोल्हापूर : ठेका धरायला लावणारा लोकवाद्यवृंद, डोलविणारे लोकनृत्य, सामाजिक वास्तवाचे दर्शन घडविणाऱ्या लघुनाटिका, पथनाट्य तसेच ओसंडून वाहणारा उत्साह अशा भन्नाट वातावरणात आज, मंगळवारी ३४ व्या जिल्हास्तरीय युवा महोत्सवात दिवसभर तरुणाईने टेन्शन खल्लास असा जाम कल्ला केला. वादविवाद, एकांकिका, सुगम गायन, मूकनाट्य अशा सर्वच स्पर्धांमध्ये तरुणाईच्या कौशल्याचे दर्शन घडले. आपल्या संघाला, स्पर्धकाला टाळ्या, शिट्ट्यांनी ‘चिअर-अप’ करणाऱ्या युवक-युवतींनी वातावरणात रंग भरला.
येथील राजाराम महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित या महोत्सवाला नियोजित वेळेपेक्षा उशिरा सुरुवात झाली. विविध ठिकाणी एकाचवेळी स्पर्धा सुरू करण्यासाठी संयोजकांची धावपळ सुरू होती. वादविवाद स्पर्धेत ‘हिंदी-चिनी भाईभाई : वास्तव की अभास’, ‘सोशल मीडिया’, आदी विषयांवर चांगलाच वाद रंगला. डॉ. बाळकृष्ण ग्रंथालय हॉलमधील लघुनाटिकेत २२ संघ सहभागी झाले. त्यांनी माळीण दुर्घटना, राजकारणाचे बदलते स्वरूप, व्यसनाधिनता, आदी विषयांबाबत प्रबोधन केले. तबला, सूरपेटी, बासरीच्या साथीने सुगम गायनाची सूरमयी सफर घडली. त्यात प्रसाद पवार, प्रतिभा चौगुले, अभयकुमार पोतदार, स्नेहल पाटील, सोनाली जाधव, प्रियांका कदम, संकेत पोरे, पूजा पाटील, आदींनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. दुपारी अडीचनंतर महोत्सवातील स्पर्धांचा वेग वाढला. खुलामंच येथील लोकवाद्यवृंदाद्वारे भारतीय पारंपरिक वाद्यांतून सादरीकरण करत आठ संघांनी उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थिनींना ठेका धरायला लावले. लोकनृत्यामध्ये लावणी, कोळीनृत्य, भांगडा आदींनी उपस्थितांना डोलविले. खुलामंचचा परिसर गर्दीने फुलला होता. वाद्यवृंद आणि लोकनृत्याच्या सादरीकरणाला टाळ्या, शिट्ट्यांच्या गजरात दाद मिळत होती. यशवंतराव चव्हाण सभागृहात वीस संघांनी एकांकिका सादर केल्या. त्यात स्त्रियांवरील अत्याचार, पुनर्जन्म, आदी विषयांचे सशक्तपणे सादरीकरण करीत विचार करायला भाग पाडले. मूकनाट्यातून आतंकवाद, पर्यावरण रक्षण, महिला सुरक्षा आदींबाबत प्रबोधन करण्यात आले. महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीसमोरील आवारात पथनाट्यांचा फेर रंगला. त्यात २७ संघांनी सहभागी होत महागाई, मतदार जागृती, अंधश्रद्धा, आदी ज्वलंत प्रश्न मांडले. हिंदी, इंग्रजी आणि मराठीतील वक्तृत्व स्पर्धेत सामाजिक समस्यांवर स्पर्धकांनी प्रकाशझोत टाकला. (प्रतिनिधी)

बिनधास्त तरुणाई...
महोत्सवातील स्पर्धा, संघ आणि स्पर्धकांची तयारी तसेच त्यांना ‘चिअर-अप’ करणे. त्यात तरुणाईचा बिनधास्तपणा दिसून आला. राजाराम महाविद्यालयाच्या निसर्गरम्य परिसरात तरुण-तरुणींचे फोटोशूट सुरू होते. महोत्सवात जिल्ह्यातील ५० महाविद्यालयांमधील सुमारे अडीच हजार विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.

नियोजनाचा सावळा-गोंधळ...नियोजनाचा सावळा-गोंधळ...
संयोजकांनी सकाळी नऊ वाजता महोत्सवाच्या उद्घाटनाचे नियोजन केले होते. मात्र, प्रत्यक्षात अकरानंतर उद्घाटन झाले. निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे महोत्सवातील सर्व कार्यक्रम रात्री पावणे दहा वाजेपर्यंत सर्व स्पर्धा, कार्यक्रम पूर्ण करण्याच्या सूचना पोलिसांनी संयोजकांना दिल्या होत्या. त्यामुळे स्पर्धेच्या पूर्वी नियोजित केलेल्या वेळा आणि जागा यात बदल करण्यात आला. उदघाटनानंतरही तास उलटला, तरी स्पर्धा सुरू झालेल्या नव्हत्या. स्पर्धेच्या ठिकाणी परीक्षक हे स्पर्धकांची प्रतीक्षा करीत बसले होते. दुपारी एकच्या सुमारास स्पर्धांना सुरुवात झाली. स्पर्धक संघांची नोंदणी, स्पर्धेच्या ठिकाणांची माहिती, आदी बाबींमध्ये नियोजनातील सावळागोंधळ महोत्सवात ठळकपणे जाणवला.

महोत्सवाला स्पर्धा नव्हे, संधी समजा
अशोक भोईटे : पारदर्शकतेसाठी महाविद्यालयांना सांकेतिक क्रमांक
शिवाजी विद्यापीठ : जिल्हास्तरीय युवा महोत्सवास उत्साही वातावरण सुरुवात, युवक-युवतींची गर्दी
कोल्हापूर : महाविद्यालयीन पातळीवरील विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शिवाजी विद्यापीठाद्वारे युवा महोत्सव घेतला जातो. या महोत्सवाला स्पर्धा नव्हे, तर संधी समजा. त्यातून करिअरचा मार्ग शोधा, असे आवाहन प्र-कुलगुरू डॉ. अशोक भोईटे यांनी आज, मंगळवारी येथे केले.
येथील राजाराम महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठाच्या ३४ व्या कोल्हापूर जिल्हास्तरीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. महाविद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण सभागृहातील कार्यक्रमास विद्यापीठाचे ‘बीसीयुडी’ संचालक डॉ. अर्जुन राजगे, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, विभागीय उच्चशिक्षण सहसंचालक आर. एम. कांबळे, डॉ. डी. आर. मोरे, प्राचार्य डॉ. वसंत हेळवी, विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. डी. के. गायकवाड प्रमुख उपस्थित होते.
डॉ. भोईटे म्हणाले, महोत्सवात तरुणाई एकवटते. त्यांच्या विचारांची देवाण-घेवाण होते. महोत्सवाच्या तयारीसाठी विद्यार्थी, विद्यार्थिनी कष्ट घेतात. यावेळीच्या काही गंमती-जंमतीदेखील असतात. विविध कलागुणांना एक व्यासपीठ यातून मिळते. त्यामुळे महोत्सवाला निव्वळ स्पर्धा नव्हे, तर एक संधी समजा. त्यातून विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरचा मार्ग शोधावा. महोत्सवात पक्षपातीपणा होतो, अशी काही विद्यार्थ्यांची तक्रार होती. त्यावर यातील स्पर्धांमध्ये पारदर्शकता येण्यासाठी विद्यापीठाने सहभागी महाविद्यालयांना सांकेतिक क्रमांक दिले आहेत. त्याद्वारेच महाविद्यालयांचे संघ त्यात सहभागी होतात.
डॉ. राजगे म्हणाले, महाविद्यालयीन, विद्यापीठ पातळीवरील महोत्सवातून कलाकार घडले आहेत. त्यामुळे कला-गुणांना संधी देणाऱ्या महोत्सवांकडे विद्यार्थी, विद्यार्थिनींनी करिअर निर्माण करण्याच्या दृष्टीने पाहावे. शैक्षणिक, ऐतिहासिक परंपरा असलेल्या राजाराम महाविद्यालयात यावर्षीचा जिल्हास्तरीय युवा महोत्सव होत असल्याचा आनंद वेगळाच आहे.
कार्यक्रमास मध्यवर्ती युवा महोत्सवाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर, कलाकार नीलेश सावे, विद्यापीठ विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष पंकज मोरे, सचिव श्वेता परुळेकर, आदी उपस्थित होते. के. के. पाटील यांनी स्वागत केले. ए. बी. टिकेकर यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)

पावसाने उडाली तारांबळ...
सायंकाळी अचानकपणे पावसाने हजेरी लावल्याने महोत्सवातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, परीक्षक आणि संयोजकांची चांगलीच तारांबळ उडाली. खुल्या रंगमंचावर सुरू असलेली लोकनृत्य स्पर्धा अर्ध्यावर थांबविण्यात आली. पावसापासून बचाव व्हावा यासाठी महाविद्यालयातील वर्ग खुले करण्यात आले. तसेच यशवंतराव चव्हाण सभागृहात लोकनृत्य स्पर्धा घेण्यात आली.
 

Web Title: Teenage youth celebrations - Not a competition for the festival, but the opportunity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.