बाजार समितीमध्ये उद्भवला तांत्रिक पेच
By Admin | Updated: November 12, 2014 00:16 IST2014-11-12T00:13:49+5:302014-11-12T00:16:33+5:30
‘पणन’च्या आदेशाला उच्च न्यायालयाकडून स्थगिती

बाजार समितीमध्ये उद्भवला तांत्रिक पेच
कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीवर ‘नवीन प्रशासक’ म्हणून डॉ. महेश कदम यांनी सोमवारी सूत्रे स्वीकारली. पणन संचालकांनी अशासकीय मंडळाच्या नेमणुकीला अंतरिम स्थगिती आदेश दिल्यामुळे डॉ. कदम यांना प्रशासक म्हणून पुन्हा हजर होण्याची संधी मिळाली आहे. परंतु, पणन संचालकांच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे बाजार समितीमध्ये पुन्हा नवा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. प्रशासकीय आणि अशासकीय मंडळाचा वाद न्यायालयीन कचाट्यात सापडला आहे. त्यामुळे बाजार समितीवर ‘कारभारी कोण’असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पणन संचालकांनी बाजार समितीचे प्रशासक डॉ. कदम यांना हटवून अशासकीय मंडळाची नियुक्ती केली होती. १५ जणांच्या अशासकीय मंडळाची संख्या १९ पर्यंत पोहोचली. याविरोधात शिवसेनेचे पंचायत समितीचे माजी सदस्य कृष्णात पोवार (भुयेवाडी) व भीमराव पाटील (केर्ली) यांनी पणन संचालकांकडे तक्रार केली होती. त्यावर ८ आॅगस्ट २०१४ मध्ये जिल्हा उपनिबंधकांनी अशासकीय मंडळाच्या केलेल्या नेमणुकीस डॉ. माने यांनी अंतरिम स्थगिती शुक्रवारी (दि. ७)दिली.
पणन संचालकांनी दिलेल्या अंतरिम स्थगिती आदेशाच्या विरुद्ध माजी चेअरमन आर. के. पोवार, व्हाईस चेअरमन प्रा. निवास पाटील, सदस्य एम. पी. पाटील, सत्यजित जाधव आदी अशासकीय मंडळाने उच्च न्यायालयात धाव घेऊन आव्हान दिले त्याची सुनावणी झाली. उच्च न्यायालयाने आदेशालाच स्थगिती दिली आहे. त्यामुळे बाजार समितीचा कारभार उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अशासकीय मंडळाकडे जाणार की पणन संचालकांच्या आदेशानुसार डॉ. कदम कारभार चालवणार, असा नवा पेच निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)
पनन संचालकांनी दिलेल्या आदेशाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. जिल्हा उपनिबंधक कोणाचा निर्णय ग्राह्ण धरून सूत्रे देतात हे आता पाहूया. परंतु, आमची लढाई सुरूच राहणार आहे.
- प्रा. निवास पाटील, माजी व्हाईस चेअरमन, बाजार समिती
उच्च न्यायालयाच्या स्थगिती आदेशाची माहिती मला मिळालेली नाही. माहिती घेतो.
- सुनील शिरापूरकर,
जिल्हा उपनिबंधक
कोणाच्या निर्णयाला ‘मान’
पणन संचालकांनी दिलेल्या आदेशामुळेच जिल्हा उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांनी डॉ. कदम यांची प्रशासक म्हणून निवड केली. दरम्यान, आता पणन संचालकांच्या आदेशाला अशासकीय मंडळाने स्थगिती मिळवली आहे. त्यामुळे जिल्हा उपनिबंधक कोणाचा आदेश मान ठेवून बाजार समितीच्या कारभाराची सूत्रे सोपविणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहेत.