कोल्हापूर : शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये गुणवत्तेचा कोल्हापूर पॅटर्न तयार करणाऱ्या महापालिकेच्या शिक्षकांना महापालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळेच शिक्षकदिनीच वेतनाविना राहण्याची वेळ आली आहे. ऑगस्टचे वेतन आज ५ सप्टेंबरलाही न झाल्याने शिक्षक हवालदिल झाले आहेत.कोल्हापूर महापालिकेच्या ५८ शाळांमध्ये ४०० शिक्षक कार्यरत आहेत. या शिक्षकांचे राज्य सरकार व महापालिकेच्या प्रत्येकी ५० टक्के निधीतून वेतन केले जाते. गेल्या काही वर्षांपासून वेतन ठरलेल्या वेळेनुसार कधीच होत नाही. मात्र, गणेशोत्सवापूर्वी वेतन करण्याचा आदेश राज्य सरकारने दिला होता. मात्र, सरकारच्याही या आदेशाला महापालिकेने केराची टोपली दाखवली असून, ५ सप्टेंबर उजाडला तरी वेतन न झाल्याने शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारचा ५० टक्के निधी याआधीच आला आहे. मात्र, महापालिकेचा निधी न मिळाल्याने हे वेतन प्रलंबित राहिले आहे.
महापालिकेची मान उंचावली, तरीही दुर्लक्षमहापालिकेचे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये राज्यात चमकत आहेत. या यशात शिक्षकांचा मोठा वाटा आहे. महापालिकेची मान यामुळे राज्यात उंचावली आहे. मात्र, तरीही महापालिका प्रशासन शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याकडे का दुर्लक्ष करते, असा सवाल शिक्षक करीत आहेत.
शिक्षकांना एक वेळ आदर्श पुरस्कार देऊ नका; पण महापालिकेने शिक्षकांचे वेतन वेळेवर करावे. वेतनास उशीर झाला, तर हातउसने करण्याची वेळ शिक्षकांवर येते. - संजय पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, कोल्हापूर शहर
महापालिकेचे बजेट न आल्याने शिक्षकांचे वेतन प्रलंबित आहे. -डी.सी. कुंभार, प्रशासनाधिकारी, महापालिका