तावडे यास पंच साक्षीदाराने न्यायालयात ओळखले; पानसरे खून खटला सुनावणी, सरकार पक्षाने संशयितांची कागदपत्रे मागवली
By उद्धव गोडसे | Updated: December 13, 2023 18:42 IST2023-12-13T18:42:38+5:302023-12-13T18:42:54+5:30
पानसरे खून खटल्यातील १७ व्या पंच साक्षीदाराची साक्ष गुरुवारी न्यायाधीश तांबे यांच्यासमोर नोंदवण्यात आली.

तावडे यास पंच साक्षीदाराने न्यायालयात ओळखले; पानसरे खून खटला सुनावणी, सरकार पक्षाने संशयितांची कागदपत्रे मागवली
कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या खुनातील संशयित आरोपी वीरेंद्रसिंह तावडे याच्या अटकेवेळी उपस्थित असलेल्या पंच साक्षीदाराने न्यायालयात सुनावणीदरम्यान तावडे यास ओळखले. जिल्हा व सत्र न्यायाधीश (३) एस. एस. तांबे यांच्यासमोर बुधवारी सुनावणी झाली. गुरुवारी (दि. १४) होणारी सुनावणी रद्द झाली असून, पुढील सुनावणी पाच आणि सहा जानेवारी २०२४ रोजी होणार आहे.
पानसरे खून खटल्यातील १७ व्या पंच साक्षीदाराची साक्ष गुरुवारी न्यायाधीश तांबे यांच्यासमोर नोंदवण्यात आली. संशयित आरोपी वीरेंद्रसिंह तावडे याचा पुणे पोलिसांकडून ताबा घेऊन दोन सप्टेंबर २०१६ रोजी रात्री अटक केली. त्यावेळच्या साक्षीदाराने तत्कालीन घटनाक्रमाची माहिती न्यायालयात दिली. तत्कालीन अपर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा आणि निरीक्षक अमृत देशमुख यांच्या उपस्थितीत तावडे यांच्या अटकेची प्रक्रिया झाली. अटक केल्याचे त्यांची पत्नी आणि वडिलांना कळविण्यात आले. अटकेतील तेच तावडे न्यायालयात उपस्थित असल्याचे साक्षीदारांनी ओळखले. उलट तपासात संशयितांच्या वकिलांनी पंच साक्षीदारावर प्रश्नांची सरबत्ती करीत, अटकेची प्रक्रिया नियमानुसार झाली नसल्याचे मत मांडले. ॲड. समीर पटवर्धन, ॲड. वीरेंद्र इचलकरंजीकर, ॲड. अनिल रुईकर, ॲड. डी. एम. लटके यांनी उलट तपास घेतला.