मार्चअखेर साठ कोटींच्या वसुलीचे लक्ष्य
By Admin | Updated: September 4, 2014 00:22 IST2014-09-04T00:21:32+5:302014-09-04T00:22:11+5:30
भुदरगड नागरी सहकारी पतसंस्था : महिन्याभरात वीस हजारांपर्यंतच्या ठेवींचे वाटप

मार्चअखेर साठ कोटींच्या वसुलीचे लक्ष्य
कोल्हापूर : भुदरगड नागरी सहकारी पतसंस्थेची थकीत कर्जवसुली मोहीम गतिमान होणार असून, त्या दृष्टीने अवसायक मंडळाने नियोजन केले आहे. मार्च २०१५ अखेर किमान साठ कोटी रुपयांची थकबाकी वसुली करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, त्या दृष्टीने येत्या आठ दिवसांत वसुली मोहीम कार्यान्वित करण्यात येणार आहे.
भुदरगड पतसंस्थेचे अवसायक मंडळाचे अध्यक्ष म्हणून डॉ. पी. बी. खंडागळे काम पाहत होते; पण त्यांची बदली झाल्याने कामकाज करताना अडचणी निर्माण होऊ लागल्या. यासाठी कोल्हापूर विभागीय सहनिबंधक राजेंद्रकुमार दराडे यांची अवसायक मंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासह अवसायक मंडळाचे सदस्य व जिल्हा विशेष लेखापरीक्षक बाळासाहेब यादव, जिल्हा उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांनी गेले चार दिवस संस्थेच्या आर्थिक परिस्थितीची माहिती घेऊन वसुली व ठेवी वाटपाबाबत धोरण निश्चित केले.
‘भुदरगड’साठी राज्य शासनाच्या पॅकेजमधील १५ कोटी ५० लाख रुपये मंजूर झालेले आहेत. यामधून दहा हजार रुपयांपर्यंतच्याा ठेवींचे वाटप गेले दीड वर्ष सुरू आहे; पण त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने दहा ते वीस हजारांपर्यंतच्या ठेवी वाटपाची प्रक्रिया सुरू होणार आहे. या ठेवीदारांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू झाले असून, महिन्याभरात दहा ते वीस हजार रुपयांपर्यंतच्या ठेवीदारांना पैसे दिले जाणार आहेत. पतसंस्थेची एकूण थकबाकी १६० कोटी असून, ठेवीदारांचे १२४ कोटी रुपये अडकले आहेत. यासाठी वसुली मोहीम अधिक तीव्र केली जाणार आहे. ४२०० थकबाकीदार असून त्यांच्या जंगम जप्तीची कारवाई सुरू झाली आहे. संस्थेच्या दोन कर्मचाऱ्यांबरोबर एक वसुली अधिकारी असे पथक तयार करण्यात आले आहे. मार्च २०१५ अखेर किमान ६० कोटी रुपये वसूल करून ठेवीदारांचे जास्तीत जास्त पैसे देण्याचा अवसायक मंडळाचा प्रयत्न आहे. (प्रतिनिधी)
पतसंस्थेच्या संचालकांवर कलम ८८ अनुसार जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. त्यांच्यावर निश्चित केलेल्या ४८ कोटींपैकी आतापर्यंत दोन कोटींची वसुली झाली असून, त्यांच्या मालमत्तेचा शोध घेऊन पुढील कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
‘भुदरगड’ची वसुली मोहीम सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून गतिमान केली आहे. तिचे नियोजन पूर्ण झाले असून, थकबाकीदारांच्या मालमत्ता शोधून कारवाई करण्याचे आदेश वसुली अधिकाऱ्यांना दिले आहेत. मार्चअखेर साठ कोटी रुपये वसूल करून ठेवीदारांना मुक्त करण्याचा प्रयत्न राहणार आहे.
- राजेंद्रकुमार दराडे, अध्यक्ष, ‘भुदरगड’ अवसायक मंडळ