तारकर्ली - पुणे एस. टी. बसफेरीला अखेर मुहूर्त
By Admin | Updated: October 24, 2015 00:29 IST2015-10-23T23:26:49+5:302015-10-24T00:29:20+5:30
स्थानिकांना होणार लाभ : तारकर्ली येथून दुपारी ३.३० वा. सुटणार, भाजपचा वर्षभर पाठपुरावा

तारकर्ली - पुणे एस. टी. बसफेरीला अखेर मुहूर्त
मालवण : तारकर्ली देवबाग हे पर्यटनाचे हॉटस्पॉट आहे. दरवर्षी येणाऱ्या लाखो पर्यटकांत पुणे, कोल्हापूर येथील पर्यटकांची संख्या जास्त असते. त्यामुळे तारकर्ली येथून पुणे एस. टी. बस सुरु करावी अशी तालुका भाजपची एस. टी. प्रशासनाकडे आग्रही मागणी होती. वर्षभर केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, दसऱ्याच्या मुहूर्तावर तारकर्ली मालवण ते पुणे-निगडी या गाडीचा प्रारंभ भाजपा तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी श्रीफळ वाढवून केला. यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
तारकर्ली येथून दुपारी ३.३० वाजता सुटणारी ही बस बाजारपेठमार्गे मालवण बसस्थानकात येणार आहे. त्यानंतर मालवण बसस्थानकातून कणकवली - कोल्हापूर मार्गे पुणे निगडी असा या गाडीचा मार्ग आहे. दररोज धावणाऱ्या या बसचा पर्यटकांसह प्रवासीवर्गाला फायदा होणार आहे.
यावेळी मनोज मोंडकर, शहराध्यक्ष दादा वाघ, तारकर्ली सरपंच मोहन केळुसकर, गजानन ठाकूर, पूर्वा ठाकूर तसेच मालवण बसस्थानकाचे अधिकारी कुडपकर, आबा सामंत, चालक प्रशांत कवठकर, वाहक घुगे, भाजप पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)
भाजपच्या मागणीला यश
पुणे, कोल्हापूर येथून येणाऱ्या पर्यटकांना तारकर्ली देवबाग येथे जाण्यास थेट गाडी नव्हती. मालवणात उतरल्यानंतर रिक्षा, वा अन्य वाहनांचा वापर करावा लागत होता. खासगी वाहनांचे प्रवासी दर सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत. तारकर्ली- पुणे अशी बस सोडावी अशी मागणी भाजपने वर्षभरापूर्वी केली होती. त्यानंतर सतत पाठपुरावा करून दसऱ्याच्या मुहूर्तावर या गाडीचा शुभारंभ करण्यात आला. पर्यटकांनी तसेच देवबाग- तारकर्ली येथील ग्रामस्थांनी या बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बाबा मोंडकर यांनी केले आहे.