‘भुले’बाबत डॉक्टरांशी स्पष्टपणे बोला

By Admin | Updated: October 17, 2014 00:38 IST2014-10-17T00:13:50+5:302014-10-17T00:38:57+5:30

शीतल देसाई : जागतिक भूलशास्त्र दिनानिमित्त आयोजित परिसंवादातील सूर

Talk to the doctor about 'forgetting' clearly | ‘भुले’बाबत डॉक्टरांशी स्पष्टपणे बोला

‘भुले’बाबत डॉक्टरांशी स्पष्टपणे बोला

कोल्हापूर : भुलेविषयी रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांमध्ये नको तो गैरसमज आहे. त्यामुळे आॅपरेशनमध्ये काही धोका तर नाही ना? हमखास हा प्रश्न भूलतज्ज्ञांना भूलपूर्व तपासणीच्या वेळेस रुग्णांकडून विचारला जातो. मात्र, जरूर ती काळजी घेतल्यास सर्वसाधारण शस्त्रक्रियेमध्ये निरोगी मनुष्यास अत्यल्प धोका संभवतो. भुलेविषयी काही प्रश्न असेल तर डॉक्टरांशी मनमोकळेपणे बोला, असे आवाहन जागतिक भूलशास्त्र दिनानिमित्त इंडियन सोसायटी अ‍ॅनस्थेटिस्ट कोल्हापूर विभागाच्यावतीने आयोजित परिसंवादातून तज्ज्ञ डॉक्टरांनी केले.
शाहू स्मारक भवन येथे आज, गुरुवारी आयोजित परिसंवादात डॉ. शकील मोमीन यांनी मार्गदर्शन केले. हृदयक्रिया बंद पडल्यावर आपत्कालीन स्थितीत करावयाच्या उपाययोजना याविषयीची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. भुलीसंदर्भातील माहितीपर पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
याप्रसंगी उपस्थितांच्या शंकांचे निरसनही डॉ. देसाई यांनी केले. असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. शीतल देसाई यांनी प्रास्ताविक केले; तर डॉ. संदीप कदम यांनी आभार मानले. डॉ. स्वप्ना शिवेश्वर यांनी सूत्रसंचालन केले.
या परिसंवादास संघटनेचे सेक्रेटरी डॉ. महेश म्हेतर, डॉ. आबासाहेब शिर्के, डॉ. शंकर अमणगी, डॉ. मकरंद पवार, डॉ. सुमती कुलकर्णी, डॉ. आरती जाधव, डॉ. शिरीष पवार, डॉ. अमोल कोडोलीकर, वैद्यकीय विद्यार्थी तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

नियोजित शस्त्रक्रियेपूर्वी हे लक्षात ठेवा...
ाूल देणाऱ्या डॉक्टरांना (अ‍ॅनेस्थेटिस्ट) अगोदर जरूर भेटा व आपली भीती व शंका दूर करा.
आपले जुने आजार, शस्त्रक्रिया, आधीच्या भुलेबाबतचा अनुभव व सध्या चालू असलेली औषधे यांची माहिती द्या.
आॅपरेशनला जाताना सैलसर, सुती व स्वच्छ कपडे घाला, डॉक्टरांच्या सर्व सूचना तंतोतंत पाळा.
शस्त्रक्रियेपूर्वी किमान चार तास तोंडाने अन्नच नव्हे; पण पाण्याचा थेंबही घेऊ नका.
नेल पॉलिश, लिपस्टिक, सुटा दात, कवळी, कॉन्टॅक्ट लेन्स, दागिने, बांगड्यांचा वापर आॅपरेशनच्या दिवशी टाळा.
आॅपरेशनपूर्वी किमान आठवडाभर मद्य व धूम्रपान वर्ज्य करा.
आॅपरेशनच्या दिवशीच ताप, सर्दी, पडसे, खोकला आल्यास डॉक्टरांना तशी कल्पना द्या.
तातडीची शस्त्रक्रिया ठरल्यास रुग्णाने घेतलेले अन्न, पाणी, धूम्रपान, इत्यादींबाबत डॉक्टरांना पूर्ण कल्पना द्या.
छोट्या शस्त्रक्रियेनंतर त्याच दिवशी घरी जाणार असाल तर बरोबर जबाबदार व्यक्ती असणे आवश्यक आहे.
घरी गेल्यानंतर भूल देणाऱ्या डॉक्टरांना आपले क्षेमकुशल कळवा व आपला अनुभव सांगा.

Web Title: Talk to the doctor about 'forgetting' clearly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.