मंडल अधिकाऱ्यासह तलाठी अटकेत
By Admin | Updated: June 30, 2014 00:40 IST2014-06-30T00:17:01+5:302014-06-30T00:40:45+5:30
पोलीस कोठडी : चुकीच्या पध्दतीने फेरफार नोंदणी करणे भोवले

मंडल अधिकाऱ्यासह तलाठी अटकेत
दापोली : तालुक्यातील सालदुरे येथील एकाच जमिनीचे दोन व्यक्तींना खरेदीखत देऊन पहिल्या खरेदीदाराच्या नावावर जमिनीची नोंद न करता दुसऱ्याच्या नावावर चुकीच्या पद्धतीने फेरफार नोंद करण्यात आली. याप्रकरणी निलंबीत असलेला मंडल अधिकारी पांडुरंग शीद व टाळसुरेतील तलाठी शिरीष गडदे या दोघांना शनिवारी दापोली पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
गडदे हे तलाठी संघटनेचे माजी अध्यक्ष आहेत. दाभोळ येथील रिजवान बामणे याने तीन वर्षांपूर्वी सालदुरे येथील जागा दोन जणांना खरेदीखताने विकली. पहिले खरेदीखत ठाणे येथील सावर्डेकर नावाच्या व्यक्तीच्या नावे, तर दुसरे मुंबई येथील खान नावाच्या व्यक्तीच्या नावे करण्यात आले. त्यावेळी दापोली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. एकच जमीन दोघांना विकल्याबद्दल रिजवान बामणे याला पोलिसांनी अटक केली होती. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
तत्कालीन मंडल अधिकारी व लाचखोरीने निलंबीत झालेला पांडुरंग शीद व सध्या टाळसुरे येथे असणारा तलाठी शिरीष गडदे या दोघांवरही २०१३ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चौकशीत गडदे याने सालदुरे येथील जमिनीच्या फेरफारीची नोंद आसूदच्या फेरफारात केल्याचे निष्पन्न झाले. त्याला शीद याने सहकार्य करुन तशीच नोंद घातली. यामुळे चुकीचे शासकीय दस्तऐवज तयार करुन फसवणूक केल्याचे पुढे आले आहे. या दोघांनाही दापोलीच्या न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)