पाचट कुजवा, पाणीटंचाईला दूर पळवा

By Admin | Updated: January 12, 2016 00:42 IST2016-01-12T00:10:04+5:302016-01-12T00:42:40+5:30

लाखमोलाचे सेंद्रिय खत : उत्पादन खर्चही कमी; जिल्हा परिषद, कृषी विभागाकडून प्रबोधनाची गरज

Take away the debris, scarcity of water | पाचट कुजवा, पाणीटंचाईला दूर पळवा

पाचट कुजवा, पाणीटंचाईला दूर पळवा

सध्या ऊस तोडणीचा हंगाम सुरू आहे. ऊस तुटून गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात उसाचा पाला (पाचट) शेतात शिल्लक राहतो. हे पाचट जाळून टाकण्यापेक्षा ते प्रत्येक सरीत अथवा एक सरी आड जर दाबून बसविले तर ते कुजून मोठ्या प्रमाणात सेंद्रिय व गांडूळ खत निर्मितीला चालना मिळते, तर पिकाला दिलेल्या पाण्याचे बाष्पीभवन होण्याचे प्रमाण कमी होऊन पाण्याची बचत होते. त्यामुळे सध्याच्या दुष्काळसदृश स्थितीत कमी पाण्यात अधिकाधिक उत्पादन घेता येणे शक्य आहे. पाचट कुजविल्याने जमिनीची उत्पादकता वाढून शेतकऱ्यांना आर्थिक फायदा मिळतो.
पाचट जाळण्यापेक्षा ते सरीतच गाडल्यास लाखमोलाचे सेंद्रिय खत शेतातच निर्माण होते. त्यामुळे इतर खते देण्याचे प्रमाण कमी होऊन पैशांची बचत होते. उसाला अधिक पाणी देण्याकडे आपल्याकडील बहुतांश शेतकऱ्यांचा कल आहे; मात्र दिलेल्या एकूण पाण्यातील फक्त वीस टक्केच पाण्याचा पिकास उपयोग होतो. उर्वरित अधिकतर पाण्याचे बाष्पीभवन होते, हे अनेक शेतकऱ्यांना माहीतच नाही. सध्याच्या पाणीटंचाईच्या काळात शेतकऱ्यांनी जर पाचट सरीतच ठेवले तर उपलब्ध कमी पाण्यात चांगले उत्पन्न काढणे शक्य आहे. कारण पाचटामुळे जमीन झाकली गेल्याने पूर्वी दिलेल्या पाण्याचे बाष्पीभवन कमी होते. त्यामुळे दहा दिवसांनी पाणी देण्याऐवजी पंधरा दिवसांनी दिले तरी चालते. यातूनच पाण्याची बचत होऊन ते पाणी इतर पिकांसाठी वापरता येणे शक्य आहे. पाचट न जाळल्यामुळे त्यातून निर्माण होणाऱ्या हानीकारक कार्बनडायआॅक्साईड कमी होतो. पाचट शेतातच ठेवल्याने तणाचे प्रमाण कमी होते. यामुळे पिकाला योग्य प्रमाणात अन्नद्रव्य मिळते. उत्पादन खर्चही कमी होऊन उत्पन्न वाढीला चालना मिळते.
चार वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेचे तत्कालीन शेती अधिकारी उमेश पाटील यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये प्रबोधन करून उसाचे पाचट न जाळता शेतातच कुजविण्यासाठी लोकचळवळ उभी केली होती. अभियानांतर्गत जो शेतकरी चांगल्या पद्धतीने व जास्त क्षेत्रात पाचट राखून पाचट अभियानात भाग घेईल त्यांना विमान प्रवासाचे बक्षीस ठेवले होते. पण, पाटील यांच्या बदलीनंतर हे अभियान बंद झाले आहे. सध्याची पाणीटंचाई लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने पुन्हा पाचट अभियान राबवावे.


पाचट अभियानाकडे शासनाचे दुर्लक्ष
पाचट जाळल्यास शेतातील तणकट जळते, पाचट ठेवल्याने उंदीर, साप मोठ्या प्रमाणात होतात, पाणी पाजण्यास अडथळा होतो, मशागतीस त्रास होतो अशा गैरसमजुतीतून शेतकरी पाचट राखण्याऐवजी जाळतात. त्यामुळे २०१२ मध्ये जि.प.चे तत्कालीन शेती अधिकारी उमेश पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यात ‘पाचट अभियान’ ही नवी संकल्पना घेऊन पाचट न पेटविता ते सरीतच दाबल्यास त्याचे खत तयार होते याबाबत प्रबोधन केले. त्यांच्या बदलीनंतर हे अभियान थांबले. कृषी विभागाने ते पुन्हा सुरू करणे आवश्यक आहे.


आजही पाचट अभियान सुरू आहे. केंद्राकडून सॉईल हेल्थ मिशन अंतर्गत फार्म रेसिडयू मॅनेजमेंट हाती घेऊन आॅरगॅनिक कार्बन रिसाकल करून तो वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांमध्ये प्रबोधन व्हावे, यासाठी रिंगटोनसुद्धा प्रसारित आहेत. पाचट कुजविल्यामुळे पाणी, खत, मशागत खर्चात बचत होऊन उत्पादनात वाढ होते.
- बसवराज मास्तोळी (आत्मा प्रकल्प)


नैसर्गिक शेतीला गांडूळ खताची आवश्यकता आहे. त्यामुळे शेतातच पाचट कुजविल्यास त्याचा फायदा होतो. पाचटामुळे भविष्यात खार फूट, नापीक जमीन होण्याचा धोका टळणार आहे.
- सुभाष पाटील, कोपार्डे

Web Title: Take away the debris, scarcity of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.