गांधीनगर - कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी व गडमुडशिंगी ग्रामदक्षता समितीने दिलेल्या सूचनांचे पालन न करता खासगी डॉ. महेंद्र श्रीधर कलवारी यांनी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर उपचार केल्याने त्याच्याविरोधात कारवाई करावी, अशी मागणी गडमुडशिंगी ग्रामपंचायतीने करवीरचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांच्याकडे केली आहे.
गडमुडशिंगी येथे ३० बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. गावातील खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांना जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना सांगण्यात आल्या होत्या. सर्व डॉक्टरांनी या बैठकीला उपस्थित राहत ग्रामदक्षता समितीला सहकार्य करणार असल्याचे सांगितले होते. पण महेंद्र कलवारी यांनी बैठकीला दांडी मारली. शिवाय ग्रामदक्षता समितीच्या सूचना डावलत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर उपचारही केले. त्याची कोणतीही माहिती दक्षता समिती अथवा प्राथमिक आरोग्य केंद्राला दिली नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गडमुडशिंगी ग्रामपंचायत प्रशासनाने केली आहे.