सामाजिक ऐक्याचे प्रतीक- श्री ज्योतिर्लिंग यात्रा म्हासुर्ली लेख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:22 IST2021-04-25T04:22:47+5:302021-04-25T04:22:47+5:30
धामणी खोऱ्याची जीवनदायिनी असलेल्या धामणी नदी काठावर आणि तीन तालुक्यांच्या मध्यवर्ती सीमेवर वसलेल्या म्हासुर्लीसह (ता. राधानगरी) पंचक्रोशीचे आराध्य ...

सामाजिक ऐक्याचे प्रतीक- श्री ज्योतिर्लिंग यात्रा म्हासुर्ली लेख
धामणी खोऱ्याची जीवनदायिनी असलेल्या धामणी नदी काठावर आणि तीन तालुक्यांच्या मध्यवर्ती सीमेवर वसलेल्या म्हासुर्लीसह (ता. राधानगरी) पंचक्रोशीचे आराध्य दैवत ज्योतिर्लिंगाची चैत्र यात्रेचा आजचा पवित्र दिवस. उच्च-नीच, गरीब-श्रीमंत आदी भेदभाव न पाहता सामाजिक ऐक्याचे प्रतीक असलेली ही यात्रा. मात्र, कोरोना या जागतिक महामारीचा पार्श्वभूमीवर गतवर्षीपासून ही यात्रा रद्द करण्यात आली असली तरी ही यात्रा महामारीच्या संकटावर मात करून पुन्हा नव्याने जगण्याची उमेद देणारी ठरेल.
पंचक्रोशीतील जागरूक देवस्थान म्हणून ख्यातकीर्त असणारे येथील ग्रामदेवतांची ज्योतिर्लिंगाची चैत्र पौर्णिमेस दोन दिवस चालणारी ही यात्रा स्थानिक प्रशासनाच्या नियोजनानुसार भरविली जाते. दोन दिवस चालणाऱ्या या यात्रेत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या यात्रेसाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेशातून या यात्रेत हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. लाखो रुपयांची उलाढाल असलेली ही धामणी खोऱ्यासह जिल्ह्यातील एक प्रमुख यात्रा. तमाशा आणि कुस्ती या दोन रांगड्या ग्रामीण कला जिवंत ठेवणारी यात्रा कोरोनाच्या प्रतिबंधासाठी यात्रेच्या शेकडो वर्षांच्या कालखंडात प्रथमच रद्द करण्यात आली. यात्रा रद्द झाली असली तरी मोजक्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत सामाजिक अंतर राखून श्रीच्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत श्रीची पारंपरिक पद्धतीने सालाबादाप्रमाणे सालंकृत पूजा करण्यात येणार असून, भाविकांसाठी मंदिर बंद राहणार आहे .
‘घरीच राहा, सुरक्षित राहा’
कोरोना या जागतिक संकटाचा सामना सर्वांनी एकजुटीने करावयाचा असून, सरकारने वेळोवेळी दिलेल्या सूचना व आदेशांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. सर्वांनी वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता राखण्याबरोबरच लॉकडाऊनच्या काळातही सहकार्य करणे गरजेचे आहे. अत्यावश्यक असल्यासच घराबाहेर पडणे, नेहमी साबणाने हात धुणे, चेहऱ्यावर मास्कचा वापर करणे, सकस आहार घेणे, सोशल डिस्टन्स पाळणे आदी सूत्रांचा वापर केल्यास कोरोनापासून बचाव करता येतो. याचबरोबर शेतीची कामे अगर इतर वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्स पाळावयाचे आहे. आपले घर, गाव, जिल्हा, राज्य सुरक्षित राहिले, तरच देश सुरक्षित राहील. ही सर्वांची वैयक्तिक व सामुदायिक जबाबदारी असून, यात जातपात, धर्म, उच्च-नीच, गरीब- श्रीमंत आणि राजकारण या गोष्टी टाळून आपण सर्वांनी एकजुटीने सामना करून या महामारीवर निश्चित विजय मिळवू.
गतवर्षीपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा रद्द झाली असून, मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे. भाविकांनी मंदिरात गर्दी न करता घरातूनच प्रार्थना करून आशीर्वाद घ्यावेत.
-दगडू दादू चौगले, यात्रा समितीप्रमुख
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत प्रशासनाने वेळोवेळी योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना केल्या असून, ग्रामस्थही काटेकोरपणे पाळत आहेत. लवकरच आपण यावर मात करू.
-सर्जेराव चौगले, अध्यक्ष, ज्योतिर्लिंग सेवा संस्था
या यात्रेस शेकडो वर्षांची परंपरा असून, यात्रेच्या इतिहासात गतवर्षीपासून यात्रा रद्द करण्यात येत आहे. कोरोना प्रतिबंधासाठी यात्रा रद्द करून आम्ही सामाजिक ऐक्याचा संदेश पोहोचवत आहोत.
-युवराज पाटील (सर), सामाजिक कार्यकर्ते