गडहिंग्लजमध्ये स्वाईन फ्लूने तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2017 01:00 IST2017-07-10T01:00:14+5:302017-07-10T01:00:14+5:30
गडहिंग्लजमध्ये स्वाईन फ्लूने तरुणाचा मृत्यू

गडहिंग्लजमध्ये स्वाईन फ्लूने तरुणाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
गडहिंग्लज : आठवड्यापूर्वी स्वाईन फ्ल्युची लागण झालेल्या येथील रवींद्र रामचंद्र सांगलीकर (वय ४३, रा. संभाजीनगर, कडगाव रोड, गडहिंग्लज) यांचा उपचार सुरू असताना कोल्हापूर येथील एका खासगी दवाखान्यात मृत्यू झाला. गडहिंग्लज शहरातील स्वाईनचा हा पहिला बळी ठरला.
गडहिंग्लज बसस्थानकाच्या आवारात सांगलीकर यांचे चप्पल विक्री व दुरुस्तीचे दुकान आहे. आठवड्यापूर्वी ते काही कामानिमित्त बेळगावला गेले होते. तेथून आल्यानंतर त्यांना सर्दी-खोकल्याचा त्रास सुरू झाला. गडहिंग्लजमध्ये उपचार घेतल्यानंतरही खोकला कमी न झाल्याने त्यांना कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे तपासणीत त्यांना स्वाईन फ्लू झाल्याचे निष्प्पन झाले. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, दोन भाऊ, दोन बहिणी व दोन मुलगे असा परिवार आहे.
‘गडहिंग्लज’कर हळहळले..!
सांगलीकर यांचे मूळ गाव कर्नाटकातील सिंदीकुरबेट, गडहिंग्लज हे त्यांचे आजोळ. सुमारे ५० वर्षांपूर्वी त्यांचे कुटुंबीय गडहिंग्लजमध्ये स्थायिक झाले आहे. त्यांचे वडील व भाऊदेखील येथील बसस्थानक परिसरात चप्पल दुरुस्तीचा व्यवसाय करतात. अलीकडेच रवींद्र यांनी बसस्थानक आवारात स्वतंत्र दुकान सुरू केले होते. त्यांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाल्याने गडहिंग्लज बसस्थानक आवारातील सर्व दुकानदारांनी दुकाने बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या अकाली मृत्यूने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
नगरपालिकेतर्फे जनजागृती मोहीम
गडहिंग्लजमधील औषधोपचारानंतरही रवींद्र यांचा खोकला कमी झाला नव्हता. म्हणून त्यांना कोल्हापूर येथील एका खासगी दवाखान्यात दाखल केले. तेथील तपासणीअंती त्यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याचठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू होते. शनिवारी मध्यरात्री उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली.
रवींद्र यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाल्यानंतर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून त्यांच्या कुटुंबातील ११ जणांवरही औषधोपचार सुरू करण्यात आले आहेत. आरोग्य विभाग व नगरपालिकेतर्फे जनजागृतीची मोहीम हाती घेण्यात आली आहे.