स्विमर्सना ‘बॅक’स्ट्रोक
By Admin | Updated: March 17, 2016 23:50 IST2016-03-17T23:31:34+5:302016-03-17T23:50:28+5:30
जलतरण तलाव बंदचा फटका : नऊशेहून अधिकजणांचा सराव रखडणार

स्विमर्सना ‘बॅक’स्ट्रोक
सचिन भोसले -- कोल्हापूर -विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जलतरण तलाव दोन महिने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी जर कोल्हापुरात झाली तर जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेची तयारी करणारे जलतरणपटू दोन महिने सरावापासून वंचित राहतील. याशिवाय सुमारे दहा हजारांहून अधिक हौशी जलतरणपटू , नवशिके आणि सुटीत पोहण्याचा आनंद लुटणारी मुले या निर्णयामुळे पोहण्यापासून दूर राहतील, अशी भिती जाणकारांकडून व्यक्त होत आहे.
सद्य:स्थितीत कोल्हापुरात एकूण सात जलतरण तलाव आहेत. यापैकी तीन महापालिकेचे, तर खासगी पाच जलतरण तलाव आहेत. त्यामध्ये महापालिकेच्या अंबाई टँकमध्ये कमी तिकीट दर असल्याने सर्वसामान्य वर्गातील १६०० ते २००० मुले दिवसभरातील आठ बॅचेसमधून दररोज पोहण्याचा व शिकण्याचा आनंद लुटतात. याचसारखी स्थिती रमणमळा, शाहू जलतरण तलाव येथेही आहे. याशिवाय शिवाजी स्टेडियम ट्रस्टचा जलतरण तलाव, खासगी भवानी जलतरण तलाव, रेसिडेन्सी क्लब, सागर पाटील जलतरण तलाव अशा चारही ठिकाणी मोठे शुल्क भरूनही पोहण्याचा आनंद व स्पर्धेची तयारी करणाऱ्या जलतरणपटूंचा समावेश आहे. सुमारे दहा हजारांहून अधिक जण पोहण्याच्या आनंदापासून दूर राहणार आहेत. त्यात जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय जलतरण स्पर्धेची तयारी करणाऱ्या खेळाडूंची संख्याही सुमारे ९०० इतकी आहे. त्यांनाही या निर्णयाचा फटका बसणार आहे. कोल्हापूरने विरधवल खाडे, मंदार दिवसे यांसारखे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतरणपटू दिले आहेत. येथील जलतरण तलावातच त्यांनी आपल्या करिअरचा श्रीगणेशा केला. कोल्हापुरात इतर जिल्ह्यांसारखी पाणीटंचाई नाही. त्यामुळे या तलावांवर निर्बंध आणून हे बंद करू नयेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
महापालिकेचे तलाव हे गोरगरिबांचे पोहणे, शिकणे व स्पर्धेची तयारी करणे याकरिता मोठा आधार आहेत. दुष्काळग्रस्त भागात आपले क्षेत्र मोडत नाही. याशिवाय हे पाणी काय दररोज भरावे लागत नाही. वारंवार हे पाणी फिल्टर करून वापरले जाते. त्यामुळे कोल्हापूरला वगळून हा निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी अन्य जिल्ह्यांत लागू करावा.
- एस. डी. मोहिते, जलतरणपटू.
जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या जलतरण तलावातून सुमारे ९०० जलतरणपटू येणाऱ्या विविध स्पर्धांकरिता सराव करीत आहेत. त्यामध्ये जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटूंचा समावेश आहे. त्यात विशेष म्हणजे पाण्याचे शुद्धिकरण सातत्याने होत असल्याने तेच पाणी पुन्हा तलावात सोडले जाते. त्यामुळे दररोज इतके पाणी लागत नाही. या निर्णयातून कोल्हापूरला वगळावे.
- अजित सरनाईक, जलतरण प्रशिक्षक.
सरकारच्या आदेशानुसार तो प्राप्त झाल्यानंतर आयुक्तांशी चर्चा करून कोल्हापुरातही अंमलबजावणी करावी लागणार आहे. त्यात महापालिका असो अथवा खासगी जलतरण तलाव
असोत, आदेशाप्रमाणे कार्यवाही करावी लागेल.
- प्रमोद बराले, इस्टेट विभागप्रमुख, मनपा.