कागल शहराच्या वाढीव हद्दीचे होणार भूमापन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:31 IST2021-09-10T04:31:37+5:302021-09-10T04:31:37+5:30
कागल : कागल नगरपालिकेने २००९ मध्ये केलेल्या हद्दवाढीमुळे शहराचे नगरपालिका हद्दीतील क्षेत्र सहा पटीने वाढले होते. आता महाराष्ट्र ...

कागल शहराच्या वाढीव हद्दीचे होणार भूमापन
कागल :
कागल नगरपालिकेने २००९ मध्ये केलेल्या हद्दवाढीमुळे शहराचे नगरपालिका हद्दीतील क्षेत्र सहा पटीने वाढले होते. आता महाराष्ट्र शासनाने या विस्तारित क्षेत्राचे भूमापन (सिटी सर्व्हे) करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे कागलकरांची मोठी अडचण दूर होणार आहे, अशी माहिती नगराध्यक्षा माणिक माळी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भय्या माने, उपनगराध्यक्ष विवेक लोटे, ज्येष्ठ नगरसेवक चद्रंकात गवळी, रमेश माळी आदी मान्यवर उपस्थित होते.
शासनाच्या महसूल व वनविभागाकडून या भूमापनाला मंजुरी मिळाली आहे. एक वर्षाच्या आत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश पुणे भूमिअभिलेख कार्यालयास देण्यात आले आहेत. हद्दवाढीमुळे मोठे क्षेत्र नगरपालिकेस जोडले गेले, पण सिटी सर्व्हे झाले नसल्याने तेथे मूलभूत सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात अडचणी येत होत्या. आता सिटी सर्व्हे झाल्यानंतर भूखंड क्रमांक, रस्ते, गटर्स, रहिवासी क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, राखीव क्षेत्र, बगीचे, शाळा, अंगणवाडया उद्याने आदींसाठी जागा निश्चित करून मूलभूत सोयी सुविधा पुरविण्यास कोणतीच अडचण येणार नाही, असेही यावेळी सांगितले.
चौकट 01 जाहीरनाम्यातील वचनपूर्ती..
भय्या माने म्हणाले की, नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व अपक्ष आघाडीच्या वतीने हद्दवाढीने नव्याने समाविष्ट क्षेत्राचे भूमापन करण्याचे, तसेच विकास आराखडाही तयार करण्याचे अभिवचन कागलवासीयांना दिले होते. ते आम्ही पूर्ण केले असून हद्दवाढ आणि आता सिटी सर्व्हे मंजुरी ही मोठी कामे आमचे नेते व राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यामुळे झाली आहेत.
असे आहे हद्दवाढीचे क्षेत्र
२००९ मध्ये कागल नगरपालिकेचे एकूण भौगोलिक क्षेत्र ५२४ हेक्टर इतके होते, तर कसबा कागल या नावाने २४०० हेक्टर क्षेत्र महसुली क्षेत्र म्हणून नोंद होते. कागल हद्दीत असले तरी नगरपालिकेशी या क्षेत्राचा संबंध येत नव्हता. यामध्ये शेती, शेतातल्या वस्त्या, उद्योग, व्यवसाय यांचा समावेश होता. हद्दवाढीमुळे नगरपालिकेचे एकूण भौगोलिक क्षेत्र २९०० हेक्टर झाले.