Suresh Prabhu 20 minutes stuck in the elevator - 'CA Institute' happened during the visit | सुरेश प्रभू २० मिनिटे अडकले लिफ्टमध्ये-‘सीए इन्स्टिट्यूट’भेटीवेळी घडला प्रकार
सुरेश प्रभू २० मिनिटे अडकले लिफ्टमध्ये-‘सीए इन्स्टिट्यूट’भेटीवेळी घडला प्रकार

ठळक मुद्देउपस्थितांची उडाली तारांबळ-त्यांना बाहेर काढेपर्यंत अनेकांची पाचावर धारण

कोल्हापूर : केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभू हे शुक्रवारी सायंकाळी तब्बल २० मिनिटे लिफ्टमध्ये अडकल्याने तारांबळ उडाली. दाभोळकर कॉर्नर येथील ‘सीए इन्स्टिट्यूट’ला ते भेट देण्यास गेले होते. लिफ्टमधून जाताना ती मध्येच बंद पडली. ती खाली सोडून त्यांना बाहेर काढेपर्यंत अनेकांची पाचावर धारण बसली. सुदैवाने कोणतीही दुर्दैवी घटना घडली नाही.

घडले ते असे : येथील महासैनिक दरबार हॉलमध्ये नेशन फर्स्ट संस्थेतर्फे कोल्हापूर बिझनेस कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी प्रभू हे कोल्हापुरात आले होते. कार्यक्रमापूर्वी सायंकाळी सातच्या सुमारास ते दाभोळकर कॉर्नर येथील चार्टर्ड अकौंटंट्स इन्स्टिट्यूटला भेट देण्यासाठी गेले. तळमजल्यावरून लिफ्टने जाताना ही लिफ्ट अचानक मध्येच बंद पडली. हे लक्षात आल्यावर संयोजकांनी प्रयत्न केले; पण लिफ्ट वरही जात नव्हती व खालीही येत नव्हती. प्रभूंसह इतर लोक अडकल्याने संयोजकांची तारांबळ उडाली. तब्बल वीस मिनिटे प्रभूं या लिफ्टमध्ये अडकून पडले. बरेच प्रयत्न करूनही ही लिफ्ट सुरू झाली नाही. त्यामुळे सर्वांचे बाहेर पडणे मुश्किल झाले.

अखेर काहीजणांनी इमारतीच्या वरच्या मजल्यावर धाव घेऊन लिफ्टची सर्व यंत्रणा बंद केली व हातानेच ही लिफ्ट खाली सोडण्यात आली. पुन्हा तळमजल्यावर ती आल्यानंतर उपस्थितांनी तत्काळ शटर उघडून प्रभूंसह इतर लोकांना बाहेर घेतले. बाहेर आल्यावर सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला. त्यानंतर मंत्री प्रभू हे इन्स्टिट्यूटमध्ये पाच मजले जिन्यावरून चालत वर गेले. ठरल्यानुसार त्यांनी ‘सीएं’शी संवाद साधला. क्षमतेपेक्षा जादा लोक असल्याने ही लिफ्ट अडकल्याची चर्चा होती. या घटनेमुळे त्यांना महासैनिक दरबार येथील कार्यक्रमास येण्यास उशीर झाला. 
 

 


Web Title: Suresh Prabhu 20 minutes stuck in the elevator - 'CA Institute' happened during the visit
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.