सुरेश हाळवणकर यांची अध्यक्षपदी निवड
By Admin | Updated: November 14, 2014 00:37 IST2014-11-14T00:32:32+5:302014-11-14T00:37:43+5:30
वस्त्रोद्योग धोरण : एकसदस्यीय समिती

सुरेश हाळवणकर यांची अध्यक्षपदी निवड
इचलकरंजी : राज्यातील वस्त्रोद्योग धोरणाची फेररचना करून कापूस ते गारमेंट अशी उत्पादन साखळी निर्माण करण्याबरोबरच अस्तित्वातील उद्योगाला सोयी-सवलती देण्यासाठी इचलकरंजीचे आमदार सुरेश हाळवणकर यांच्या अध्यक्षतेखाली एकसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली. या निवडीचे पत्र राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज, गुरुवारी मुंबईमध्ये सुपूर्द केले. यावेळी वस्त्रोद्योग विभागाचे अप्पर मुख्य सचिव सुनील पोरवाल, उपसचिव डी. ए. कुलकर्णी, आदी उपस्थित होते.
इचलकरंजी वस्त्रनगरीच्यादृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे. राज्यात इचलकरंजीसह भिवंडी, मालेगाव, विटा, नागपूर, सोलापूर, मोमीनपुरा याठिकाणी यंत्रमाग व पूरक वस्त्रोद्योग विकेंद्रित स्वरूपात पसरला आहे.
देशातील एकूण यंत्रमागांपैकी ५० टक्के यंत्रमाग महाराष्ट्रात आहेत. गत सरकारच्या आडमुठ्या धोरणांमुळे हा उद्योग अनेक अडचणीतून जात आहे. त्यामुळे आमदार हाळवणकर यांनी वस्त्रोद्योगमंत्री पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यानुसार मंत्री पाटील यांनी वस्त्रोद्योग विभागाचे अप्पर मुख्य सचिव सुनील पोरवाल यांना तातडीने सूचना देऊन समिती स्थापन करण्याचे आदेश दिले.
आज या समितीचा शासन आदेश जारी करण्यात आला. त्यानुसार वस्त्रोद्योग धोरणाची फेररचना करण्यासाठी शिफारशी करणे, राज्यात उत्पादित होणाऱ्या सर्व कापसांवर राज्यातच प्रक्रिया होईल यासाठी कापूस ते तयार वस्त्रनिर्मिती प्रकल्प उभारणे, वस्त्रोद्योगाचे एकत्रिकरण करणे, नवीन टेक्स्टाईल हब, प्रोसेसिंग, टेक्स्टाईल मेगासिटी यासाठी शिफारस करणे, यंत्रमागांच्या आधुनिकीकरणासाठी उपाय, अस्तित्वातील सहकारी यंत्रमाग संस्थांचे बळकटीकरण करणे, यंत्रमाग कामगारांचे कल्याण मंडळ, यंत्रमाग संजीवनी योजना, परकीय गुंतवणूक, कामगार कायद्यात सुधारणा, निर्यात वाढ यासाठी शिफारशी करण्याची कार्यकक्षा ठरवून देण्यात आली आहे.
वस्त्रोद्योगाच्या विकासासाठी समितीला योग्य वाटेल, अशा बाबींवर उपाय सूचवू शकते. या समितीमध्ये वस्त्रोद्योग, उद्योग ऊर्जा व कामगार, वित्त, पर्यावरण, सहकार विभाग, तसेच वस्त्रोद्योग संचालक नागपूर सदस्य आहेत. (प्रतिनिधी)