जनमानसातून निर्माण झालेला कार्यकर्त्यांचा आधारवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:24 IST2021-01-25T04:24:30+5:302021-01-25T04:24:30+5:30
प्रवीणसिंह पाटील कागल तालुक्यातील कार्यकर्त्यांचा आधारवड म्हणून परिचित असणारे, शिवाय कार्यकर्त्यांवर आलेली संकटे लीलया दूर करण्यामध्ये अग्रेसर असणारे, मुरगूडचे ...

जनमानसातून निर्माण झालेला कार्यकर्त्यांचा आधारवड
प्रवीणसिंह पाटील
कागल तालुक्यातील कार्यकर्त्यांचा आधारवड म्हणून परिचित असणारे, शिवाय कार्यकर्त्यांवर आलेली संकटे लीलया दूर करण्यामध्ये अग्रेसर असणारे, मुरगूडचे माजी नगराध्यक्ष, बिद्री साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष विद्यमान संचालक, विश्वनाथराव पाटील मुरगूड बँकेचे अध्यक्ष प्रवीणसिंह विश्वनाथराव पाटील यांचा आज ५९ वा वाढदिवस, आजचा दिवस सर्वसामान्य कार्यकर्त्यांबरोबर संपूर्ण मुरगुडकरांना प्रेरणा मिळवून देणारा. समाजहिताच्या अलौकिक कार्याने प्रेरित होऊन दानशूरतेची शिदोरी घेऊन दलितांच्या, बहुजन समाजाच्या व सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या रक्षणासाठी वेळ प्रसंगी सत्तेवर तुळशीपत्र ठेवावे लागले तरी चालेल या विचारांचा वारसा घेऊन प्रवीणदादा आज ६० व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यांच्या सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक कार्याची ओळख व्हावी यानिमित्ताने त्यांच्या जीवनकार्याचा घेतलेला हा आढावा......
महाराष्ट्रामध्ये राजकीय विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कागलच्या मातीने राजर्षी शाहूंच्या रूपाने जगाला मानवतेचा, समतेचा विचार आपल्या कृतीतून आणून दाखविणारा लोकराजा मिळवून दिला. याच शाहूंच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांच्या कृतीवर श्रद्धा ठेवत जिल्हा, राज्य व देश पातळीवर अनेक माणसे घडली. यामध्ये सहकारातील आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून ज्यांचे नाव पुढे आले ते मुरगूड मधील विश्वनाथराव हरिभाऊ पाटील. याच सुसंस्कृत घराण्यामध्ये २४ जानेवारी १९६१ रोजी प्रवीणसिंह या दानशूर व कणखर नेतृत्वाचा जन्म झाला.
मुरगूड शहराच्या जडणघडणीमध्ये ३६ वर्षे नगरसेवक असलेल्या प्रवीणदादांचा पर्यायाने पाटील घराण्याचा मोठा वाटा आहे. विविध संस्थांचे अध्यक्ष, बिद्री कारखान्याचे संचालक पद या सर्वांपर्यंत जाण्यासाठी दादांचे अथक प्रयत्न आहेतच. पण वडील विश्वनाथराव व आई सुलोचनादेवी यांचा मोठा वाटा आहे. आई-वडिलांच्या आदर्श विचारांचा वारसा घेऊन त्यांनी समाजकारण आणि राजकारणामध्ये प्रवेश केला. आधुनिक शेतीचे पुरस्कर्ते, कुस्तीसह क्रिकेट आदी खेळांवर प्रेम, निराधारांचे आधार, वारकरी संप्रदायाचे वारसा लाभलेले, स्वतःच्या कुटुंबाचा नितांत आदर ठेवणारे व्यक्तिमत्व म्हणजे प्रवीण दादा. अर्थातच या सर्व पैलूंमुळे जीवनामध्ये ज्या ज्या वेळी अडचणी आल्या त्यातून दादा लीलया बाहेर आले. या जीवन पैलूंच्या आधारे दादा नेहमी यशाच्या शिखरावर पोहोचले आहेत.
राजकीय, आर्थिक सुसंस्काराने संपन्न अशा परिवारामध्ये घडताना आई-वडिलांची शिकवण, त्यांचे आशीर्वाद, सर्व भावंडांचा आधार, त्यांना कायम मिळत गेला. दादा घडताना मुरगूड शहरामध्ये प्राथमिक शिक्षण त्यांनी पूर्ण केले. रांगडे व्यक्तिमत्व असल्याने शिक्षणात त्यांना रस नव्हता. पण घरच्यांनी आग्रह केल्याने त्यांना पुढील शिक्षणासाठी पुण्याला जावे लागले. तेथील शिवाजी मिलिटरी स्कूलमध्ये त्यांनी पुढील शिक्षण घेतले. अर्थात या शिक्षणामध्ये रुची नव्हती. पण आयुष्यातील शिस्त आणि वाचनाची आवड मात्र तिथे मिळाली. शिवाय याच शाळेत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासारखा मित्र मिळवून दिला. अर्थात हे मैत्रीचे रूपांतर आता पै पाहुण्यांमध्ये बदलले आहे. लष्करी शिक्षणामुळे दादांच्या शिस्तप्रिय स्वभावगुणाला चालनाही मिळाली. शिकण्यापेक्षा दादांना क्रिकेटचे भलतेच वेड. त्यामुळे क्रिकेटमध्ये करिअर घडवण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले. भारतीय संघातील मधु रेगे, वसंत जिरगे या नावाजलेल्या खेळाडूंनी दादांना क्रिकेटमधील धडे दिले. पण मुळातच दादांचा पिंड समाजकार्याचा असल्याने गड्या आपुला गाव बरा या उक्तीप्रमाणे दादांनी पुण्याला रामराम ठोकला आणि मुरगुडच्या दिशेने आपला मोर्चा वळविला.
मुरगूडमध्ये शेतीपूरक व्यवसाय म्हणून त्यांनी वडिलांच्या मार्गदर्शनानुसार पशुपालनाला सुरवात केली. व्यायामासाठी संघटन करून आपल्या भावांच्या सहकार्याने लाल आखाडा व्यायाम मंडळाची स्थापना केली. स्वतः व्यायाम करता करता होतकरू मल्लांना प्रोत्साहन देत राष्ट्रीय, राज्य पातळीवर पोहोचविण्यासाठी मदत केली. क्रिकेटबरोबर कुस्तीला चांगले दिवस यावेत यासाठी मुरगुडच्या पाटील घराण्याने चांगले प्रयत्न केले आहेत. अर्थातच दादांच्या वाढदिवसानिमित्त अनेक वर्षांपासून कुस्तीचे भव्य मैदान मुरगूडमध्ये भरविले जाते.
खेळाकडे लक्ष देत असतानाच दादांनी शेतीकडे बारीक लक्ष दिले. शेतीमध्ये त्यांनी नवनवीन प्रयोग केले. या दरम्यानच १९८२ मध्ये वडिलांच्या सहकार्याने अवचितवाडीमध्ये चिमकाईदेवी दूध संस्थेची स्थापना करून राजकारणामध्ये दादांनी चंचूप्रवेश केला. लगेचच बिद्री कारखान्याच्या संचालक पदावर त्यांची वर्णी लागली. त्यानंतर आजतागायत या कारखान्यावर ते संचालक म्हणून कार्यरत आहेत. अर्थातच येथील पारदर्शक कार्य आणि अनुभवामुळे त्यांना पाच ते सहा वर्षे या कारखान्याच्या उपाध्यक्ष पदावर काम करण्याची संधी मिळाली.
सन १९७५ च्या दरम्यान मुरगूड पालिकेत नगरसेवक म्हणून दादांनी प्रवेश केला. त्यानंतर सलग ३५ वर्षे ते नगरसेवक म्हणून कार्यरत होते. २००२ मध्ये थेट जनतेने त्यांना नगराध्यक्ष म्हणून निवडून दिले. वडील विश्वनाथराव पाटील हे १९७१ मध्ये थेट नगराध्यक्ष झाले होते. मुरगूड परिसरातील शेतकरी वर्गाला आधारवड ठरलेल्या विश्वनाथराव पाटील मुरगूड बँकेत संचालक व सद्या अध्यक्ष म्हणून पारदर्शक काम त्यांनी करून दाखवलं. मुरगूड परिसरातील विविध संस्था उभ्या करण्याच्या कामामध्ये दादांचा वाटा मोठा आहे. दहा वर्षांपूर्वी आपल्या मातोश्री सुलोचनादेवी पाटील यांच्या नावाने चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली. या ट्रस्ट च्या माध्यमातून गरजू होतकरू मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, वक्तृत्व स्पर्धा, खेळांचे साहित्य वाटप यासारख्या सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते.
मुरगूड बँकेच्या माध्यमातून आणि ट्रस्टच्या सहकार्याने मुरगूड विद्यालयातील शेकडो मुलांची निवड करून त्यांना साहित्य तर पुरविले आहेच पण त्यातील हुशार व चुणचुणीत मुलांच्या संपूर्ण शैक्षणिक खर्चाची जबाबदारी दादांनी उचलली आहे. राजकारण करीत असतानाच समाजकारण करणे गरजेचे असते. यासाठी दादांनी अनेक कामे केली आहेत. समाजसेवेचा वसा घेतलेले नेतृत्व म्हणून कार्यकर्ते त्यांचा नेहमी उल्लेख करतात. आपल्याच गावातील खाटीक समाजातील तीन निराधार मुलींचा सांभाळ दादांनी आणि त्यांचा संसार उभा करण्यामध्ये दादांचा मोठा हातभार आहे. प्रवीण राजेंद्र या बारामतीच्या दोन अनाथ मुलांचे पालकत्वही त्यांनी पत्करले आहे. राजकीय वाटचालीत भविष्याचा विचार न करता मिळालेल्या संधीचा समाजकार्यासाठी उपयोग करण्याचा विचार आपण नेहमीच बाळगतो या बळावर आपोआप पदे चालून येतात. कार्यकर्त्यांनी हाच विचार जोपासला पाहिजे, अशी दादांची धारणा नेहमीच असते. काम करणारा कार्यकर्ताच नेता होतो यावर आपला ठाम विश्वास असून आपली ओळख समाजामध्ये कार्य करणारा कार्यकर्ता अशीच रहावी अशी भावना त्यांनी वाढदिवसाच्या पूर्व संध्येला व्यक्त केलीे. दादांच्या या अखंड समाजकार्य, राजकारण यामध्ये त्यांच्या सर्व भावंडांचे सहकार्य लाभत आहेच. याशिवाय त्यांच्या पत्नी सुहासिनीदेवी, चिरंजीव दिग्विजय, जोतिरादित्य, पुतण्या सत्यजित यांचे योगदान आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उदंड आयुष्य लाभो, हीच मनोमन मनोकामना ! आई अंबाबाई त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करो, हीच त्यांना सदिच्छा!!
शिवाजीराव पाटील
माजी सरपंच यमगे
या लेखामध्ये प्रवीणसिंह पाटील यांचा फोटो टाकावा
तसेच
आशीर्वाद म्हणून
विश्वनाथराव पाटील
दिलीपसिंह पाटील अजितसिंह पाटील
यांचेफोटो टाकावे
तर एका बाजूस
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा फोटो टाकावा