रविवार हाय..! मच्छी आणाय निघालोय...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:22 IST2021-04-19T04:22:22+5:302021-04-19T04:22:22+5:30
कोल्हापूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुकारलेल्या संचारबंदीतही काहीजण दुचाकीवरून मुक्तसंचार करत आहेत, तेही बंदोबस्तासाठी चौका-चौकात ...

रविवार हाय..! मच्छी आणाय निघालोय...
कोल्हापूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुकारलेल्या संचारबंदीतही काहीजण दुचाकीवरून मुक्तसंचार करत आहेत, तेही बंदोबस्तासाठी चौका-चौकात असलेल्या पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून विविध कारणे पुढे करत. रंकाळा टॉवर चौकात दोन दुचाकींवरील दोघा मित्रांना पोलिसांनी रविवारी सकाळी अडवले. ‘साहेब, रविवार हाय... मच्छी आणाय निघालोय’ असे कारण त्या दोघांनी पुढे केल्याने पोलीसही अचंबित झाले. पोलिसांनी त्यांच्याहाती दंडाची पावती देत मागे फिरण्यास भाग पाडले.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी गुरुवारपासून जिल्ह्यात संचारबंदी पुकारली. पोलीस जिवाची बाजी लावून प्रत्येक नागरिकाचे कोरोनापासून रक्षण करण्यासाठी रणरणत्या उन्ह्यात रस्त्यावर उतरून प्रत्येकाला घरीच थांबण्याचे आवाहन करत आहेत. अत्यावश्यक कामे असतील तरच बाहेर पडा, असा मोलाचा सल्लाही पोलिसांनी दिला. पण नागरिक कशाहीची तमा न बाळगता दुचाकी घेऊन रोजच विनाकारण रस्त्यावरून सुसाट धावत आहेत. घराशेजारी भाजी विक्रेते असताना, उगाचच बाजारात भाजी आणण्यासाठी दुचाकीवरून फिरून नागरिक कोरोनाचा संसर्ग वाढवत आहेत. पोलिसांनी पकडल्यानंतर, दवाखान्यात निघालोय, औषधे आणण्यासाठी चाललोय, दूध आणण्यासाठी निघालोय... अशी नेहमीचीच कारणे पुढे करत आहेत.
रविवारी सकाळी मिराबाग परिसरातील दोन मित्रांना दोन दुचाकींवरून गप्पा मारत जाताना रंकाळा टॉवर चौकात पोलिसांनी अडवले. त्यांनी, ‘साहेब, रविवार हाय.. पार्टी करायची हाय... मच्छी आणाय निघालोय’ असे कारण सांगितल्यावर, त्यांना काय सांगावे हेच पोलिसांना समजेना. शेवटी प्रत्येकी ५०० रुपये दंडाची पावती दोघांच्या हाती दिली व त्यांना माघारी पाठवले. बिंदू चौकात तर एका दुचाकीस्वाराने कहरच केला. कोंबडी बाजारात निघालोय, कोंबडी खरेदीला... असे कारण सांगितले. त्यावेळी संतापलेल्या पोलिसांनी त्याच्याही हाती दंडाची पावती देऊन माघारी पाठवले. हाच अनुभव पोलिसांना बंदोबस्तावेळी पावलोपावली येत आहे.
शहरात वाहनांवर कारवाई...
- गुरुवार : २५
- शुक्रवार : १५२५
- शनिवार : १०८४