कोल्हापूर : शहर, उपनगर आणि परिसरात गुरुवारी दिवसभर ऊन, ढगाळ वातावरण राहिले. मात्र, रात्री साडेनऊ वाजल्यापासून पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली. रात्री उशिरापर्यंत कोसळत राहिलेल्या या पावसामुळे रस्त्यावरून पाणी वाहत राहिले.गेल्या आठ दिवस ढगाळ वातावरण आहे. काही ठिकाणी वळवाप्रमाणे पाऊसही पडत आहे. गुरुवारी सकाळपासून आकाशात ढगांची गर्दी होती. दुपारी काही वेळ कडकडीत ऊन होते. त्यानंतर पुन्हा ढगाळ वातावरण राहिले.
पावसाने उघडीप दिली असे वाटत असताना रात्री साडेनऊ वाजल्यापासून शहर परिसरात पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस रात्री बराच वेळ कोसळत होता. ज्यांनी रेनकोट आणले नव्हते त्यांना भिजत घरी परतावे लागले. या पावसामुळे रस्त्यावरुन पाण्याचे पाट वाहायला लागले, गटारी भरून वाहत राहिल्या.