कळंब्यातील तरुणाची नैराश्येतून आत्महत्या
By Admin | Updated: January 19, 2015 00:49 IST2015-01-19T00:44:59+5:302015-01-19T00:49:57+5:30
सैन्य भरतीचे स्वप्न अधुरे : चार दिवसांपासून होता बेपत्ता; मोरे-मानेनगरमध्ये हळहळ

कळंब्यातील तरुणाची नैराश्येतून आत्महत्या
कोल्हापूर : सैन्यात भरती होण्याचे स्वप्न अधुरे राहिल्याच्या नैराश्यातून तरुणाने पंचगंगा नदीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार आज, रविवारी दुपारी उघडकीस आला. अमित विनायक कांबळे (वय २८, रा. मोरे-मानेनगर, कळंबा) असे त्याचे नाव आहे. तो १५ जानेवारीपासून बेपत्ता होता. आज त्याचा मृतदेह शिरोली पंचगंगा पुलाजवळ आढळला.
याबाबत पोलिसांनी सांगितले, अमित कांबळे याचे वडील शाहूवाडीमध्ये ‘आयटीआय’मध्ये शिक्षक आहेत. आई घरकाम करते, तर लहान भाऊ सैन्यात आहे. दोन विवाहित बहिणी आहेत. त्याचे बी.ए.पर्यंत शिक्षण झाले आहे. सैन्यात भरती होण्यासाठी तो प्रयत्न करीत होता; परंतु त्याला संधी मिळत नव्हती. गुरुवारी (दि. १५) दुपारी तो वडील आजारी असल्याने त्यांना औषध घेऊन येतो, असे सांगून घरातून बाहेर पडला, तो परत आलाच नाही. घरच्यांनी नातेवाईक, मित्रपरिवाराकडे शोधाशोध केली असता तो सापडला नाही. आज दुपारी चारच्या सुमारास शिरोली पंचगंगा नदीपात्रात तरुणाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना लोकांना दिसून आला. त्यांनी या प्रकाराची माहिती गांधीनगर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. ओळख पटण्यासाठी त्याच्या कपड्यांमध्ये शोधाशोध केली असता ओळखपत्र मिळून आले. त्यावरून पोलिसांनी त्याच्या वडिलांशी संपर्क साधला असता ते रुकडी (ता. हातकणंगले) येथील नातेवाइकांकडे गेले होते. पोलिसांचा फोन आल्याने ते ‘सीपीआर’मध्ये आले. याठिकाणी त्यांना मृतदेह दाखविला असता त्यांनी तो अमितचा असल्याचे ओळखत आक्रोश केला.
त्याच्या मृत्यूची बातमी समजताच नातेवाईक व मित्रपरिवाराने ‘सीपीआर’मध्ये गर्दी केली होती. त्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सैन्यात भरती होण्यासाठी प्रयत्न करूनही यश मिळत नसल्याने तो नाराज होता. या नैराश्यातूनच त्याने आत्महत्या केली असल्याची चर्चा घटनास्थळी होती.