महिला अधिकाऱ्याच्या त्रासातून कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न; कोल्हापुरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 12:50 PM2024-02-29T12:50:52+5:302024-02-29T12:51:27+5:30

कोल्हापूर : येथील राज्य शासनाच्या वस्तू व सेवांचा व्यवहार सांभाळणाऱ्या कार्यालयात सोमवारी दुपारी त्याच कार्यालयातील महिलेने वरिष्ठांच्या अवमानजनक बोलण्याच्या ...

Suicide attempt in office due to distress of female officer; Incidents in Kolhapur | महिला अधिकाऱ्याच्या त्रासातून कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न; कोल्हापुरातील घटना

महिला अधिकाऱ्याच्या त्रासातून कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न; कोल्हापुरातील घटना

कोल्हापूर : येथील राज्य शासनाच्या वस्तू व सेवांचा व्यवहार सांभाळणाऱ्या कार्यालयात सोमवारी दुपारी त्याच कार्यालयातील महिलेने वरिष्ठांच्या अवमानजनक बोलण्याच्या रागातून फॅनला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी बुधवारी संबंधित महिला अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी वरिष्ठांना भेटून केली. परंतु यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल झालेली नाही.

कोल्हापुरातील कसबा बावडा रोडवर असलेल्या या कार्यालयात हा प्रकार घडला. त्रास देणारी अधिकारीही महिलाच आहे. ज्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला त्या सांगलीच्या आहेत. दैनंदिन काम करताना या महिला अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक देत असल्याच्या तक्रारी आहेत.

सोमवारी दैनंदिन काम सुरू असताना त्यात काही तरी त्रुटी राहिल्यावर त्या महिला कर्मचाऱ्यांवर खेकसल्या. तुम्ही एवढ्या निर्बुद्ध असताना राज्य लोकसेवा आयोगाने तुम्हाला कसे निवडले, अशी भाषा त्यांनी वापरली. तुम्ही या कार्यालयात काम करण्याच्या लायकीच्याच नाही, असेही त्या म्हणाल्यावर त्या महिला कर्मचाऱ्याने गळ्यातील ओढणी काढून फॅनवर टाकली आणि त्यांच्यासमोरच कार्यालयातच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. 

तिथे झालेला आरडाओरडा ऐकून अन्य कर्मचाऱ्यांनी त्यांना तसे करण्यापासून परावृत्त केले परंतु त्यामध्ये फॅनची पाती वाकली आहेत. असा प्रकार घडूनही त्या महिला अधिकाऱ्यांनी तुला आत्महत्याच करायची असेल तर बाहेर जावून कर, किंवा तिसऱ्या मजल्यावरून उडी मार जा..माझ्या कार्यालयात काय करू नकोस, अशी भाषा वापरल्याची माहिती जबाबदार सूत्रांकडून मिळाली. ही अधिकारी संवेदनाहीन असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली.

Web Title: Suicide attempt in office due to distress of female officer; Incidents in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.