Kolhapur: खेळण्यांची जत्रा, तिच्यावर अभ्यासाची मात्रा; खेळणी विकण्यात मदत करत दहावीत सुहानाचे यश
By संदीप आडनाईक | Updated: May 14, 2025 15:35 IST2025-05-14T15:35:00+5:302025-05-14T15:35:18+5:30
अनेकदा वर्गशिक्षकांकडून विचारणा व्हायची, पण परिस्थितीची जाणीव असलेल्या सुहानाने कधी प्रत्युत्यर दिले नाही, मान खाली घालून ती याबाबत निरुत्तर व्हायची

Kolhapur: खेळण्यांची जत्रा, तिच्यावर अभ्यासाची मात्रा; खेळणी विकण्यात मदत करत दहावीत सुहानाचे यश
संदीप आडनाईक
कोल्हापूर : शाहू कॉलेजमध्ये साध्या घरात राहणारी आणि वडील रफिक शेख यांना जत्रेच्या हंगामात खेळणी विकण्यात मदत करून कोरगावकर हायस्कूलच्या सुहाना रफिक शेख हिने शालान्त परीक्षेत ८४ टक्के गुण मिळवून लखलखीत यश मिळवले आणि आईवडिलांच्या कष्टाचे चीज केले.
दैनंदिन जीवनात रिक्षा चालवणे हाच तिच्या वडिलांचा व्यवसाय, मात्र या व्यवसायामध्ये आर्थिक बेरजेपेक्षा वजाबाकीचेच गणित अधिक असल्याने साईड बिजनेस म्हणून तिच्या वडिलांनी पंचक्रोशीतील गावांमध्ये आणि परिसर, उपनगरामध्ये जत्रा आणि यात्रात खेळणी विकण्याचा व्यवसाय पत्करला. एकट्याला हा व्यवसाय करणे आणि त्यावर नियंत्रण करणे जमत नसल्याने अनेकदा छोट्या सुहानाची मदत मिळायची, बऱ्याचदा यासाठी तिची शाळाही चुकायची.
अनेकदा वर्गशिक्षकांकडून विचारणा व्हायची, पण परिस्थितीची जाणीव असलेल्या सुहानाने कधी प्रत्युत्यर दिले नाही, मान खाली घालून ती याबाबत निरुत्तर व्हायची. आपल्या व्यवसायामुळे मुलीची शाळा चुकते याची तिच्या वडिलांनाही खंत असायची. बरेचदा वडील शाळेत येउन शिक्षकांकडे आपल्या भावना व्यक्त करत.
मात्र, आपला बुडालेला अभ्यास सुहाना ज्या ठिकाणी जत्रेमध्ये स्पॉट असे त्या ठिकाणी थांबून वेळ मिळेल तेव्हा अभ्यासाचे पुस्तक घेऊन बसायची. ज्यावेळी ग्राहक नसेल त्या वेळेला पुस्तकांच्या पानांशी ती अधिक मैत्री करायची. काही मैत्रिणींना विचारून शाळेतला बुडलेला अभ्यास पूर्ण करून तो अभ्यास ती शिक्षकांना दाखवत असे . केवळ अभ्यासातच नव्हे तर ॲथलेटिक्स या क्रीडा प्रकारातही तिचे नैपुण्य होते. या प्रकारातील ग्रेसमार्कही तिला मिळालेले आहेत.
शाळेतील सांस्कृतिक विभाग तिच्याशिवाय पूर्ण होत नसे. गाणी, वक्तृत्व, एकपात्री प्रयोग यामध्येही तिने आपला वेगळा ठसा उमटवला होता. एकंदरीत सुहानाच्या या यशाला सोनेरी किरण लाभल्याने पालकांसह शाळेतील प्रत्येक घटकास आनंद झाला आहे. कोरगांवकर हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सौंदलगे, पर्यवेक्षिका प्रमिला साजणे, सुरेखा पोवार, वर्गशिक्षिका हेमलता पाटील आणि सर्वच विषय शिक्षकांनी सुहानाचे यशाबद्दल भरभरून कौतुक केले.